सध्या मराठीमध्ये नवनवीन विषयांवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने तर बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांची कमाई केली. आता मराठीमध्ये आणखी एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. ‘अंकुश’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टीझर अखेरीस प्रदर्शित झाला आहे.
अॅक्शन, रोमान्स व मनोरंजनाचा मसाला असलेल्या या चित्रपटाच्या टीझरकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेरीस टीझर समोर आल्यानंतर प्रेक्षक याचं कौतुक करत आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये नवोदीत अभिनेता दीपराज घुले, केतकी माटेगावकरसह सयाजी शिंदे, ऋतुजा बागवे, मंगेश देसाई, चिन्मय उद्गीरकर आदी कलाकारांची झलक पाहायला मिळत आहे. शिवाय अॅक्शन सीन्सची झलक कौतुकास्द आहे.
राजाभाऊ आप्पाराव घुले निर्मित व निशांत धापसे दिग्दर्शित ‘अंकुश’ चित्रपटाची कथा नामदेव मुरकुटे यांनी लिहिली आहे. या अॅक्शनपॅक चित्रपटातून दीपराज घुले हा नव्या दमाचा अभिनेता पदार्पण करत आहे. त्याच्यासह अभिनेत्री केतकी माटेगावकर, अभिनेते सयाजी शिंदे, मंगेश देसाई, शशांक शेंडे, भारत गणेशपुरे, नागेश भोसले, गौरव मोरे, चिन्मय उदगीरकर, ऋतुजा बागवे, पूजा नायक अशी तगडी स्टारकास्ट आहे.
मराठीतील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक अमितराज व चिनार-महेश यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर हिंदीतील प्रसिद्ध संगीतकार अमर मोहिले यांनी चित्रपटाला पार्श्वसंगीत दिलं आहे. मंगेश कांगणे, क्षितिज पटवर्धन, समृद्धी पांडे आणि मंदार चोळकर यांनी गीतलेखन केलं आहे. तर आदर्श शिंदे, हृषिकेश रानडे, अमितराज, हर्षवर्धन वावरे, राहुल सक्सेना, नकाश अजीज आणि केतकी माटेगांवकर यांच्या आवाजात चित्रपटाची गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. येत्या ६ ऑक्टोबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होईल.