सोशल मीडियाद्वारे खासगी आयुष्याबाबत व्यक्त होणं काही कलाकार मंडळींना आवडतं. त्यातीलच एक म्हणजे अमृता खानविलकर. अमृता तिच्या खासगी आयुष्याबाबत खुलेपणाने व्यक्त होताना दिसताना. वर्षभरापूर्वी अमृताच्या मावशीचं निधन झालं. मावशीच्या निधनानंतर अमृतासह तिचं संपूर्ण कुटुंबच कोलमडून गेलं होतं. ती तिच्या मावशीच्या खूप जवळ होती. आता वर्षभरानंतर मावशीबाबत बोलताना अमृताला रडू कोसळलं आहे.
झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात अमृताने हजेरी लावली होती. यावेळी फोनद्वारे एका व्यक्तीशी संवाद साधायची संधी तिला मिळाली. यावेळी अमृताने मावशीला फोन केला आणि तिच्या अश्रूंचा बांध फुटला. अमृता म्हणाली, “हॅलो, माऊ कशी आहेस?. वर्ष झालं तुझा आवाज ऐकला नाही. तुला कुठेतरी मी ट्रीपला घेऊन गेले नाही. मम्मीचं खूप वजन कमी झालं आहे. तुझी खूप आठवण येते”.
“मला माहीत आहे की, जिकडे आहेस तिकडे आता तू खूप सुखी आहेस. मला हेही माहीत आहे की, तुला आता मधुमेह नाही, पोटात दुखत नाही, चालताना त्रास होत नाही, तुझ्या भेगांमधून रक्त येत नाही म्हणून तू आता आनंदात आहेस. पण एकच विचारायचं आहे तुला इतकं सगळं करायची काय गरज होती?. स्वतःला संसारामध्ये, मुलांमध्ये, बहिणींच्या मुलांमध्ये जीव गुंतवायची काय गरज होती? कधीतरी स्वतःसाठी जगली असतीस तर थोडी आणखीन जगली असतीस. कधीतरी स्वतःचा विचार केला असता तर असं वाटलं असतं तू आमच्या सगळ्यांचा विचार करत आहेस. का सगळं अंगावर काढलंस?. आजारपण, दुखणं, त्रास याबाबत कधीच का बोलली नाही?. नाही नाही मी ओरडत नाही तुला पण माझ्या मनातलं सांगत आहे. सगळ्यांसाठी करुन ठेवलंस पण स्वतःसाठी कोणतीच जबाबदारी नव्हती का तुझी?”
आणखी वाचा – लेकीच्या घटस्फोटासाठी नीना गुप्ता स्वतः जबाबदार, मसाबा गुप्ताचा मोठा खुलासा, म्हणाली, “माझ्या आईला…”
“किती वेळा वाटलं होतं तुला डॉक्टरकडे घेऊन जावं, त्रासातून मुक्त करावं. पण तुला अशाप्रकारे आम्हाला सोडून जायचं होतं. मला एवढंच सांगायचं आहे की, पुढच्या जन्मी तू जशी होती तसाच जन्म घे. तेव्हा स्वतःसाठी जग, स्वतःसाठी जगायला शिक. कारण तू ठिक तर घर ठिक. तू ठिक तर आम्ही ठिक. आता तू जा आप्पा-आजी वाट बघत असतील. आय लव्ह यु”. अमृताचं बोलणं ऐकून उपस्थितांचेही डोळे पाणावले.