मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये अभिज्ञा भावेचं नाव आवर्जुन घेतलं जातं. अभिज्ञाने आजवर मराठी चित्रपट, मालिकांमध्ये उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांना आपलसं केलं. पडद्यावर वावरत असताना खासगी आयुष्यातील तणाव तिच्या चेहऱ्यावर कधीच दिसला नाही. सोशल मीडियाद्वारे अभिज्ञा तिच्या खासगी आयुष्याबाबत फारसं बोलताना दिसत नाही. पण आता तिच्या जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर तिने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
अभिज्ञाच्या आजीचं निधन झालं आहे. त्या ९३ वर्षांच्या होत्या. तिने आजीबरोबरचा फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच आजीवर असणारं प्रेम व्यक्त केलं. अभिज्ञा म्हणाली, “माझ्या सगळ्यात खास व खोडकर मुलीला खूप प्रेम. तू ९३ वर्ष आनंदात जगलीस हे मला माहीत आहे. तू सगळ्यांवर खूप प्रेम केलं. तुला सगळ्यांकडून खूप प्रेम मिळालं. तू आम्हा सगळ्यांना एकत्र ठेवलं”.
“खोलीमधील ते हसू, तुझ्या डोळ्यातील गमतीशीर चमक, तुझी नाजुक मिठी, तु मला पडद्यावर पाहिलंस की, तुझा चेहरा अगदी उजळत होता. ९०च्या दशकातही ज्या मुलीला सुंदर कपडे परिधान करायला आवडायचे, स्वतः कसे दिसत आहोत याकडे लक्ष असायचं. गॉगल्स, स्वयंपाकघर, साड्या, खाऊ यावर असलेलं तिचं प्रेम खूप वेगळं होतं”.
“सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी माझ्या सगळ्यात मोठ्या चाहत्याला खूप मिस करणार आहे जो माझ्याबाजूने कायम बोलत होता, आहे आणि राहील. तुला अभिमान वाटेल असंच काम मी करेन. माझ्या हृदयामध्ये तुझ्या आठवणी कायमच असतील असं मी वचन देते. तू होतीस, तू आहेस आणि तू कायमच माझ्यासाठी खास असशील. माझी प्रिन्सेस प्रमिला भावे”. अभिज्ञाने पोस्ट शेअर केल्यानंतर तिच्या आजीला कलाकार मंडळी कमेंट्सच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.