आपली मुलं उत्तम शिकावीत, असं सर्वच पालकांना वाटतं आणि यासाठी प्रत्येक पालक आपल्या मुलांसाठी मेहनत घेत असतात. यासाठी अनेक पालक त्यांच्या मुलांना परदेशातही पाठवतात. कलाकार मंडळीदेखील त्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवत असतात. नुकतेच अभिनेता व दिग्दर्शक प्रसाद ओकच्या मुलाचे शिक्षण परदेशात पूर्ण झाले. अभिनेत्याने मुलाच्या पदवी प्रदान सोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अशातच आणखी एका दिग्दर्शकाच्या मुलाचे परदेशात शिक्षण पार पडले असून तो आता पदवीधर झाला आहे.
दिग्दर्शक रवी जाधव यांचा मुलगा अंश जाधवने कॅनडातील एका मोठ्या कॉलेजमधून डिजीटल फ्युचर्समध्ये पदवी मिळवली आहे. त्यानिमित्ताने रवी जाधव यांनी लाडक्या लेकासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या मुलाचं भरभरून कौतुक केलं आहे. रवी यांनी खास फोटो शेअर करत या फोटोखाली त्यांच्या आनंदी भावना व्यक्त करत असे म्हटले आहे की, “प्रत्येक पालकांसाठीचा अभिमानाचा क्षण! माझ्या मुलाने नुकतीच OCAD युनिव्हर्सिटी, कॅनडातून डिजीटल फ्युचर्समध्ये बॅचलर ऑफ डिझाईन (ऑनर्स) ही पदवी पूर्ण केली आहे. त्यामुळे पालक म्हणून आम्हाला (रवी व मेघना) खूपच आनंद झाला आहे”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “त्याला ही उत्कृष्ट कामगिरी करताना आणि त्याचं ध्येय साध्य करताना पाहणं हा आमच्यासाठी एक अविश्वसनीय प्रवास होता. आता त्याच्यासमोर त्याच्या आयुष्याचा पुढचा मोठा प्रवास आहे आणि खूप चांगल्या संधी त्याची वाट बघत आहेत. त्यामुळे यानिमित्ताने त्याला खूप साऱ्या शुभेच्छा”. रवी जाधव यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, रवी जाधव यांनी ‘नटरंग’, ‘टाईमपास’, ‘न्यूड’, ‘बालगंधर्व’ यांसारख्या अनेक लोकप्रिय व हिट चित्रपटांतून आपल्या दिग्दर्शनाची छाप पाडली आहे. अशातच नुकत्याच दिग्दर्शित केलेल्या ‘मैं अटल हू’ मधून त्यांनी स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. त्यांच्या ‘ताली’ या सुष्मिता सेनच्या वेबसीरिजची प्रचंड चर्चा झाली. त्यामुळे त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगाही या सिनेसृष्टीत येणार की अशी आशा आता सर्वांनी व्यक्त केली आहे.