सहजसुंदर अभिनय, देखणे सौंदर्य, दिलखेचक अदा अन् हटके स्टाईलमुळे चाहत्यांमध्ये कायमच चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. छोटा पडदा असो वा मोठा पडदा, प्राजक्ताने कायमच तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. अभिनेत्री तिच्या लाघवी बोलण्याने कायमच चाहत्यांची मनं जिंकत आली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधील सूत्रसंचालनामुळे प्राजक्ता नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. त्याचबरोबर सोशल मीडियाद्वारेही ती चाहत्यांच्या तितकीच संपर्कात राहत असते.
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. सोशल मीडियावर ती कायमच तिचे अनेक स्टायलिश फोटो शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने तिच्या सिंगापूर दौऱ्याचे काही खास फोटो शेअर केले आहेत. सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम सिंगापूरच्या दौऱ्यावर आहे. अवघी टीम परदेशामध्ये आपल्या सुट्टीचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहे आणि याचेच काही खास क्षण प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसाद खांडेकर, समीर चौघुले, चेतना भट, रोहित माने, ओंकार राऊत, नम्रता प्रधान, श्याम राजपूत, पृथ्विक प्रताप, रासिका वेंगुर्लेकर या कलाकारासंह प्राजक्ता माळी सिंगापूरमध्ये धमाल करत आहेत. यांच्याबरोबर प्राजक्ता माळीची आईदेखील या सिंगापूर दौऱ्यावर गेली असल्याचे कळत आहे. प्राजक्ताने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात हास्यजत्रेचे कलाकार व प्राजक्ता माळी तिच्या आईसह एन्जॉय करताना दिसत आहेत.
प्राजक्ताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती आईसह सिंगापूरमधील विविध ठिकाणांना भेटी देत असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी प्राजक्ताने तिच्या आईसह काही साहसी खेळातदेखील सहभाग घेतलेला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर प्राजक्ता व तिच्या आईने खास फोटोशूटही केले आहे. हा व्हिडीओ शेअर करत प्राजक्ताने या व्हिडीओखाली कॅप्शनमध्ये “आणि आमची ‘आईसाहेब’ हास्यजत्रेच्या समूहात सामील झाली” असं म्हणत “महाराष्ट्राची हास्यजत्रा व आमची कौटुंबिक सहल” असं म्हटलं आहे.
आणखी वाचा – हृतिक रोशन-दीपिका पदुकोणच्या किसिंग सीनमुळे वायुसेना दल नाराज, ‘फायटर’ वादात, अधिकृत नोटीसही पाठवली अन्…
प्राजक्ताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांसह प्राजक्ताची आई, नम्रता संभेराव व प्रसाद खांडेकर यांचेही कुटुंब सहभागी झाले आहे. त्यामुळे प्राजक्ताच्या म्हणण्याप्रमाणेच ही एक कौटुंबिक सहल असल्याचेच जाणवत आहे. दरम्यान, या व्हिडीओला नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.