ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना राज्य शासनातर्फे दिला जाणारा जाणारा ‘महाराष्ट्र भूषण’ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आणि त्यांच्यावर, त्यांच्या अभिनयावर गेली अनेक वर्ष निस्सीम प्रेम करणारा रसिकवर्ग खऱ्या अर्थाने सुखावला. अशोक सराफ यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर होताच मनोरंजन, नाट्यसृष्टीसह राजकारण व समाजकारण या स्तरातूनही अशोक सराफ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अशातच आता त्यांचा मुलगा अनिकेत सराफनेही वडिलांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराबद्दल कौतुक केलं आहे. अनिकेतने यासंदर्भात एक खास पोस्ट केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर बाबांबरोबरचा एक कोलाज केलेला फोटो शेअर करत त्यांना जाहीर झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “माझ्या वडिलांनी एक अभिनेता आणि एक माणूस म्हणून जे काही मिळवले आहे, त्याबद्दल आयुष्यातील प्रत्येक क्षणी मला त्यांचा अभिमान वाटला आहे. त्यामुळे आता त्यांना अगदी प्रतिष्ठित मानला जाणारा ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो”.
मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अशोक सराफ गेल्या चार दशकांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी निवेदिता जोशी-सराफ यादेखील एक अभिनेत्री असून त्यांनीही मराठी चित्रपटसृष्टीचा एक काळ गाजवला आहे. आजही हे दोघे या क्षेत्रात कार्यरत आहेत. पण त्यांचा एकुलता एक मुलगा अनिकेत सराफने आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्राची वाट निवडली नाही हे विशेष. अनिकेतने एका वेगळ्याच प्रोफेशनमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
दरम्यान, अनिकेतने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच अनेकांनी अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर अनिकेतला तो हुबेहूब त्याच्या वडिलांसारखा दिसत असल्याचेही अनेकांनी म्हटले आहे.