कलाकारांचं खासगी आयुष्य जाणून घेण्यात त्यांचे चाहते अधिक उत्सुक असतात. रिअल लाईफमध्ये कलाकार मंडळी कोणत्या व्यक्तीला डेट करतात, त्यांचं रिलेशनशिप हे काही कोणापासून लपून राहिलेलं नाही. काही कलाकार त्यांच्या नात्याबाबत उघडपणे बोलताना दिसतात. तर काही आपल्या खासगी आयुष्याबाबात न बोलणंच पसंत करतात. त्यापैकीच एक म्हणजे तितिक्षा तावडे. तितिक्षा कोणत्या व्यक्तीला डेट करते याबाबत याआधीही बऱ्याच चर्चा रंगल्या. आता तिने शेअर केलेल्या फोटोंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेमध्ये तितिक्षा सध्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. ती मालिकेत साकारत असलेल्या नेत्रा या पात्राला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं आहे. सध्या तितिक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिने इन्स्टाग्रामद्वारे शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्याबरोबर खास व्यक्ती असल्याचं दिसत आहे.
निळ्या रंगाचं टीशर्ट, पांढऱ्या रंगाची शॉर्ट पँट असा तितिक्षाचा या फोटोंमध्ये लूक दिसत आहे. ‘शनिवार’ असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. विविध पोझमध्ये तिने फोटो क्लिक केले आहेत. पण तिचे हे फोटो नक्की कोणी काढले हेदेखील दिसत आहे. तिने ज्या गाडीजवळ उभं राहून फोटो काढले त्या गाडीवर अभिनेता सिद्धार्थ बोडकेची सावली दिसत आहे.
सिद्धार्थने तितिक्षाचे फोटो काढले असल्याचं यामधून सिद्ध झालं आहे. विशेष म्हणजे नेटकऱ्यांनीही तितिक्षाच्या या फोटोंवर विविध कमेंट केल्या आहेत. सिद्धार्थ बोडके कॅमेरामॅन आहे, आम्ही तुझा फोटोग्राफर पाहिला अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या. याआधीही तितिक्षा व सिद्धार्थचे एकत्र फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याच्या बऱ्याच चर्चा होत्या. तितिक्षाच्या वाढदिवसानिमित्तही सिद्धार्थ तिच्या कुटुंबियांबरोबर होता. पण अद्यापही या दोघांनी त्यांच्या नात्याची उघडपणे कबुली दिलेली नाही. पण तितिक्षा व सिद्धार्थच्या जोडीला चाहत्यांची अधिकाधिक पसंती मिळते एवढं नक्की.