मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तीनही माध्यमांत काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. आजवर त्यांनी अनेक विविधांगी भूमिका साकारत त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतील त्यांच्या भूमिकेला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. सुप्रिया या एक उत्तम अभिनेत्री आहे हे तर आपण जाणतोच. पण त्या एक उत्तम व्यावसायिकाही आहेत. त्यांचा मुलगा मिहीर पाठारे हा एक शेफ असून या मायलेकाने एक नवीन व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला फूड ट्रकपासून सुरु झालेल्या या व्यवसायाने पुढे हॉटेलपर्यंत मजल मारली.
ठाण्यातील केवडा सर्कल येथे ‘मharaj’ पावभाजी आणि फास्ट फूड कॉर्नर या नावाने त्यांनी त्यांचं नवीन हॉटेल सुरू केलं. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी या हॉटेलला भेटी देत हॉटेलमधील पदार्थांचा आस्वाद घेतानाचे अनेक फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मध्यंतरी हे हॉटेल बंद होणार असल्याच्या अनेक अफवा पसरवण्यात आल्या होत्या. यावर सुप्रिया यांनी स्पष्टीकरण देत व्हिडीओ शेअर केला होता. आईच्या निधनामुळे काही दिवस हॉटेल बंद झाल्याचे त्यांनी या व्हिडीओद्वारे सांगितले होते. यानंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत काही तांत्रिक अडचणींमुळे हॉटेल बंद होणार असल्याचे सांगितले होते.
अशातच सुप्रिया यांनी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याद्वारे त्यांनी ‘मharaj’ हॉटेल पुन्हा एकदा सुरू होणार असल्याची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर करत त्यांनी असे म्हटले आहे की, “२ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर उद्या (८ डिसेंबर) पासून ‘मharaj’ हॉटेल पुन्हा सुरू होत आहे” असं म्हणत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. याबरोबरच यापुढे त्यांनी हॉटेलचा पत्ताही दिला आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओखाली खव्वयांनी कमेंट्स करत आनंद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर हॉटेल पुन्हा एकदा नव्याने सुरू होत असल्यामुळे ठाण्यातील खवय्यांसाठी ही आनंदाची बातमी आहेत आणि खव्वये यासाठी चांगलेच आतुर आहेत. त्याचबरोबर सुप्रिया आगामी काळात कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार? यासाठी त्यांचे चाहतेदेखील उत्सुक आहेत.