कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी कलाकार घेत असलेली मेहनत उल्लेखनीय आहे. काही कलाकार मंडळी तर अगदी सामान्य कुटुंबामधून आलेली आहेत. मेहनत व हिंमतीच्या जोरावर अनेक नट-नट्यांनी अभिनयक्षेत्रात नाव कमावलं. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे. सुप्रिया यांचं आज मालिका विश्वामध्ये मोठं नाव आहे. विनोदी भूमिकांपासून ते मालिकांमधील साधं-सरळ पात्र त्यांनी उत्तमरित्या साकारलं. पण त्यांचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता.
सुप्रिया यांना अगदी लहानपणापासून घरातील जबाबदारी सांभाळावी लागली. त्यासाठी त्यांनी घरकामंही केली. याचबाबत त्यांनी एका मुलाखतीत भाष्यही केलं होतं. त्या म्हणाल्या होत्या की, “मला एसीपी, इन्स्पेक्टर असं कायतरी व्हायचं होतं. माझ्या आईच्या घरची परिस्थिती फार काही चांगली नव्हती. मी घरात सगळ्यात मोठी. आईने कधी शिक्षण घेण्यासाठी नकार दिला नाही. पण परिस्थितीबरोबर काम करणं खूप गरजेचं होतं.
आणखी वाचा – Video : हेमा मालिनीच्या वाढदिवसाला पती धर्मेंद्र यांची हजेरी, केक कापत केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
“त्यामुळे मी खूप गोष्टी केल्या आहेत. लोकांच्या घरी भांडी घासली, कपडे धुतले आहेत. रस्त्यावर अंडी व चणे घेऊन विकायला बसायचे. खूप म्हणजे खूप कष्ट केले आहेत. पाचवी-सहावीमध्ये असताना मी हे सगळं केलं आहे. त्यादरम्यान आमच्या शाळेच्या एक बाई मी जिथे अंडी विकायला बसायचे त्या रस्त्याने जात होत्या. तेव्हा माझ्या आईला बाईंनी शाळेत बोलावलं”.
“मुलगी मोठी झाली तिला असं आता रस्त्यावर बसवू नका असं सांगितलं. यामागचं कारण म्हणजे मी जिथे उमरखाडीमध्ये राहत होती तिथे दारुचे अड्डे खूप होते. तर चकणा म्हणून लोक अंडी व चणे घेऊन जायचे. मात्र मी अशी होते की, मला कोणी हात लावणार नाही हे आईला माहित होतं. मग शाळेचा खर्च माझ्या त्या शाळेतील बाईंनीच केला. त्यावेळी मला शाळेचा ड्रेस दोन रुपयाला मिळायचा. १८ घरांची आम्ही भांडी घासायचो. मी शाळेत गेल्यानंतर आई कामं करायची. आईने माझ्या खूप कष्ट केले”. सुप्रिया यांची मेहनत आणि त्या कलाक्षेत्रात करत असलेलं काम खरंच कौतुकास्पद आहे.