अभिनय सृष्टीत काम करत करत बऱ्याच कलाकारांनी आपली पावले व्यवसायाकडे वळविली आहेत. गेल्या काही महिन्यात अनेक मराठी कलाकार निरनिराळ्या व्यवसायात उतरले आहेत. काही कलाकारांनी स्वतःचं हॉटेल सुरु केलं आहे, तर काहींनी साड्या, कपड्यांचे स्वतःचे असे ब्रॅण्ड्स सुरु केले आहेत. तर अनेकांनी दागिन्यांचा व्यवसाय सुरु केला आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे, प्राजक्ता माळी, अक्षया नाईक, प्रार्थना बेहरे यांसारख्या अनेक अभिनेत्रींनीं अभिनयाबरोबरच व्यवसाय क्षेत्रात उडी घेतली. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आता आणखी एका अभिनेत्रीने व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. (Mira Jagannath New Business)
बिग बॉस मराठी मधील एका अभिनेत्रीने स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली आहे. या कंपनीद्वारे ती अनेक कार्यक्रमाचं आयोजन व नियोजन करणार आहे. ही अभिनेत्री म्हणजे मीरा जगन्नाथ. मीराने बिग बॉसच्या घरात सहभाग घेऊन अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली. बिग बॉसमुळे मीराला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आता मीराने स्वतःची अशी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली आहे. मिरच्या कंपनीचं नाव आहे ‘मीरामी’ मीडिया’.
मीराने सुरु केलेल्या या कंपनीबाबत तिने इंस्टाग्राम असत करत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. मीराने पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, ‘उत्कृष्ट व सुंदर गाण्यांच्या जादूचा अनुभव घ्या असं म्हणत माझ्या ‘मीरामी’ मीडिया द्वारे लवकरच उत्तम, दर्जेदार कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आत्तापर्यंत माझ्या सर्व कलाकृतींना तुम्ही जी मोलाची साथ दिलीत तिच साथ यापुढेही देत राहाल अशी आशा. तुमच्या लाडक्या मीरा जगन्नाथच्या ‘मिरामी’ला सुद्धा असंच कायम प्रेम देत रहा.’
मीराच्या ‘मीरामी’ या कंपनीअंतर्गत तिने गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. नवरात्री निमित्त गायक महेश काळे आणि हरिहरन यांच्या गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन ‘मीरामी’ या कंपनी अंतर्गत करण्यात आलं होतं. मीराच्या नव्या इनिंगची बातमी कळताच तिच्यावर अनेक चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षांव केला.