सध्या अनेक नाटकांचे परदेश दौरे जोरदार सुरु आहेत. नाटकातील ही कलाकार मंडळी इतर कामातून ब्रेक घेत परदेश दौरे करण्यात व्यस्त आहेत. अशातच ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून घराघरांत पोहचलेला सर्वांचा लाडका कुकी म्हणजेच अभिनेता अतुल तोडणकर मालिकेतून ब्रेक घेत परदेश दौरा करण्यात व्यस्त आहे. मालिकेतू कुकी कामानिमित्त मुंबईत गेला असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र खऱ्या आयुष्यात कुकी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त अमेरिकेत आहे. (Atul Todankar Infected)
सध्या अतुल ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकानिमित्त परदेश दौरा करत असतानाच त्याच्यावर खूप मोठं संकट ओढवलं. नाटकाच्या दौऱ्यानिमित्त अतुल आजारी पडला असल्याचं कळलं. मात्र आजारी पडूनही अतुलने नाटकाच्या प्रयोगांत कोणताही खंड पडू दिला नाही. नाटक पाहायला आलेल्या प्रेक्षकांचा हिरमोड होऊ नये यासाठी अतुलने ओढवलेल्या अवस्थेत काम करत साऱ्या प्रेक्षकांची मनं जिंकली.
याबाबतचा एक व्हिडीओ पोस्ट करत त्याने फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. या फेसबुक पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पोस्ट शेअर करत त्याने लिहिलं आहे की, “आज ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या आमच्या नाटकाचा दुसरा अमेरिका दौरा संपला. या दौऱ्याच्या खूप संमिश्र आठवणी आहेत. शो मस्ट गो ऑन. माझा हा अमेरिकाचा तिसरा दौरा. मोठेपणा मिरवत नाही आहे. म्हणजे तशी इथल्या वातावरणाची सवय आणि अंदाज आला आहे, पण या वेळेस गंम्मत केली अमेरिकेने. नाटकाचे हाऊसफ़ुल्ल शो चालू होते. ‘शिकागो’, ‘सेंट लुईस’ व ‘डॅल्लस’चा शो झाल्यावर मला शिंगल्सचा त्रास झाला. म्हणतात की कांजण्याचं वायरल इन्फेक्शन.
अर्धा चेहरा व डोळा सुजला होता. पण अमेरिकेचे दर्दी रसिक प्रेक्षक, त्यांचा तुफान प्रतिसाद, आमची नाटकाची टीम आणि आमचा जादूगार प्रशांत दामले यांच्यासमवेत, त्या प्रत्येक तीन तासात काहीतरी घडायचं आणि प्रयोग पार पडायचा. आज आमची दौऱ्याची सांगता झाली आहे आणि मी पूर्ववत होतो तसा झालो आहे. हीच तर नाटकाची गंम्मत आहे मित्रांनो. या दोन्हीही विकेंडला प्रत्येक सेंटरला निष्णात डॉक्टर तैनात होते, ट्रीटमेंट उत्तम चालू होती. प्रशांत सर, आऊ, कविता आणि माझ्या संपूर्ण टीमचा मी ऋणी आहे. सर्वांना खूप खूप प्रेम.”
अतुलची ही फेसबुक पोस्ट पाहून अनेकांनी त्यांच्या या कृतीच कौतुक केलं आहे. तर अतुल तोडणकर याने केलेल्या फेसबुक पोस्टला कमेंट करत त्यांच्या चाहत्यांनी तसेच त्यांच्या इंडस्ट्रीतील सहकलाकारांनी चिंता व्यक्त केली आहे.