‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतलं. या मालिकेच्या कथानकाबरोबरच कलाकारांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशातच आता या मालिकेतील एका कलाकाराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या मालिकेतील श्रीनु हे पात्र साकारणारा अभिनेता अभिषेक गावकर याने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. (abhishek Gaonkar Engagement)
अभिषेकने त्याच्या गर्लफ्रेंडसह साखरपुडा उरकला असल्याचं समोर आलं आहे. अभिषेक व सोनाली गुरव यांचा साखरपुडा झाला आहे. अभिषेकच्या साखरपुड्यातील खास फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत. साखरपुड्यातील अभिषेकचा डान्स व्हिडीओ तर धुमाकूळ घालताना दिसत आहेत. ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेतील श्रीनु या पात्रामुळे अभिषेक घराघरात पोहोचला असला तरी याशिवाय त्याला ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील नकारात्मक भूमिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. मराठी मालिकाविश्वात अभिषेक बऱ्यापैकी सक्रिय आहे.

सोशल मीडियावरही अभिषेकचा बऱ्यापैकी वावर असलेला पाहायला मिळतो. अभिषेकची गर्लफ्रेंड सोनाली ही कंटेंट क्रिएटर म्हणून काम करत आहे. भरपूर फॉलोवर्स असलेल्या सोनालीचाही खूप मोठा चाहतावर्ग आहे. विविध विषय रीलद्वारे मांडत ती नेहमीच चहात्यांच्या संपर्कात राहत असते. प्रसिद्ध सोशल मीडिया कंटेन्ट क्रिएटरमध्ये सोनालीचं नाव आवर्जून घेतलं जात. अभिषेक आणि सोनाली बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. बरेचदा दोघेही एकत्र स्पॉट होताना दिसले आहेत. शिवाय त्यांनी एकत्र व्हिडीओ केलेलेही चर्चेत राहिले. यानंतर आता या जोडीने साखरपुडा समारंभ उरकला आहे.
साखरपुडा समारंभातील दोघांच्या पारंपरिक टच असलेल्या मॉडर्न लूकने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. अभिषेक व सोनालीच्या साखरपुडा समारंभातील सोनालीने केलेल्या कृतीनं साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतलं. अंगठी घातल्यानंतर सोनालीने खाली वाकून अभिषेकच्या पाया पडत आशीर्वाद घेतल्याचे पाहायला मिळालं. यावेळी अभिषेकही थोडासा भावुक झालेला पाहायला मिळाला. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र आलेली पाहून साऱ्यांनाच आनंदाचा धक्का बसला आहे. दोघांवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे.