सध्या सिनेसृष्टीत एका मागोमाग एक कलाकार जोड्या लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. तसेच काही कलाकार जोड्यांनी त्यांचा साखरपुडा सोहळा करत प्रेमाची कबुली दिली आहे. अशातच आता मालिका विश्वातील एका लोकप्रिय जोडीने गुपचूप त्यांचा साखरपुडा समारंभ उरकला असल्याचं समोर आलं आहे. यापूर्वी या जोडीने त्यांच्या प्रेमाची कबुली कोणत्याही माध्यमाद्वारे न देता थेट त्यांच्या साखरपुड्याच्या फोटोंनी ही जोडी एकत्र आली असल्याचं समोर आलं आहे. ‘राजा राणीची गं जोडी’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच शिवानी सोनार. शिवानीचा नुकताच शाही थाटामाटात साखरपुडा समारंभ पार पडलेला पाहायला मिळाला. (Shivani Sonar and Ambar Ganpule Engagement)
गुढीपाडव्याचं औचित्य साधत शिवानीने साखरपुडा समारंभ केला. शिवानीने ‘लोकमान्य’, ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता अंबर गणपुळेसह साखरपुडा समारंभ उरकला. याआधी शिवानी व अंबर यांनी त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली सोशल मीडियाद्वारे दिली नव्हती, त्यामुळेच दोघांच्या साखरपुड्याच्या फोटोंनी त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिवानी व अंबर यांच्या साखरपुड्याचे काही खास फोटो त्यांच्या काही कलाकार मित्रांनी सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत.
काही दिवसांपूर्वी शिवानी ‘सिंधुताई माझी माई’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचली. ही मालिका संपताच अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडा समारंभ उरकला असल्याचं समोर आलं. अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी दोघांच्या साखरपुड्याचा खास फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हर्षदा व अंबर यांनी रंग माझा वेगळा मालिकेत एकत्र काम केलं होतं. शिवानी व अंबरने त्यांच्या साखरपुड्यातील खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दोघेही रिंग फ्लॉन्ट करताना दिसत आहेत. अंगठीच्या खास डिझाइनने ही साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शिवानी व अंबर यांनी #ambani देत त्यांचे हे खास फोटो शेअर केले आहेत.
शिवानी व अंबरच्या या खास सोहळ्याला मालिका विश्वातील काही कलाकार मंडळीही उपस्थित होते. शिवानी व अंबर यांच्या साखरपुड्यातील खास लूकने साऱ्यांच्या नजरा वळवल्या आहेत. यावेळी अंबर पारंपरिक अंदाजात दिसला तर शिवानी ही मॉडर्न टच असलेल्या पारंपरिक लूकमध्ये दिसली. दोघांचाही खास लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आजवर शिवानीने मालिका विश्वातून बरीच लोकप्रियता मिळवली. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री आता लवकरच लग्नबंधनात अडकण्यास सज्ज होणार आहे. शिवानी व अंबर यांचे अचानक आलेले साखरपुड्याचे फोटो पाहून चाहतेही खुश असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.