‘दो रुपये भी बहोत बडी चीझ होती है बाबू’ या लोकप्रिय संवादाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार. मालिकाविश्वात अल्पावधीतच आपली ओळख निर्माण करणाऱ्या गायत्रीने झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून अभिनय विश्वात पदार्पण केलं होतं. या मालिकेत तिने सुबोध भावेबरोबर मुख्य भूमिका साकारली होती. तिची ‘ईशा’ ही भूमिका विशेष गाजली होती. अजूनही ती प्रेक्षकांच्या लक्षात आहे. यानंतर तिने अनेक रिअॅलिटी शोमध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
अभिनेत्री सध्या मालिका किंवा चित्रपटात काम करत नसली तरी ती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावर ती तिचे स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. तिच्या या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. या सोशल मीडियाद्वारे तिला अनेक कौतुकाचे मॅसेज व कमेंट येत असतात. मात्र एका नेटकऱ्याने तिला केलेल्या एका अश्लील मॅसेजमुळे अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे.
एका नेटकऱ्याने गायत्रीला इन्स्टाग्रामवर मॅसेज करत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. गायत्रीने नेटकऱ्याच्या या मॅसेजचा स्क्रीनशॉट तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर करत राग व्यक्त केला आहे. “अशा नीच मानसिकतेला इथेच थांबवलं पाहिजे” असं म्हणत तिने तिच्या चाहत्यांना या अकाऊंटला रीपोर्ट करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, ‘तुला पाहते रे’ या मालिके नंतर गायत्री दातारने ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातसुद्धा विनोदी भूमिका साकारली होती. या शोद्वारे तिने विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. त्यानंतर ती ‘बिग बॉस मराठी’मध्येही झळकली होती. या शोमधील तिच्या खेळाचे तिच्या चाहत्यांकडून कौतुक झाले होते. अशातच नुकतीच ती स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून चाहत्यांच्या भेटीला आली होती.