कलाकार मंडळी ही सोशल मीडियाद्वारे नेहमीच व्यक्त होत असतात. कलाकार हे आपले अनुभव, आपले किस्से, त्याचबरोबर काही खास आठवणी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात आणि या आठवणी व किस्से चाहत्यांना जाणून घेण्यातही चांगलाच रस असतो. अशाच एका अभिनेत्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास फोटो शेअर करत त्याच्या लहानपणीची एक आठवण शेअर केली आहे आणि हा अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर.
मराठी मालिका व चित्रपटांत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा संतोष आता हिंदी सिनेसृष्टीतही आपली छाप उमटवत आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबांतूण् आलेल्या या अभिनेत्याविषयेई त्याच्या चाहत्यांना खूपच कुतूहल आहे. अशातच अभिनेत्याने त्याच्या लहानपणाबद्दल एक आठवण शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. एका केसकर्तनलयाला संतोषचा फोटो लावल्यामुळे तो भारावून गेला आहे आणि त्याला झालेला आनंद त्याने या पोस्टद्वारे व्यक्त केला आहे.
संतोषने या दुकानाचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्याने असं म्हटलं आहे की, “लहानपणी बाबा सलूनमध्ये केस कापायला घेऊन जायचे. तेव्हा केस कपणारे उत्तम काका मला त्यांच्या दुकानातल्या भिंतीवर लावलेल्या अनेक हिरोंचे फोटो दाखवून विचारायचे “बाळा कुणासारखे कापू केस तुझे?, अमिताभ बच्चनसारखे की मिथुन, अनिल कपूर, शाहरुख खान की सलमान खानसारखे आणि मग त्यातला मी एक फोटो निवडायचो आणि सांगायचो. पण ते बाबा सांगतील तसेच केस कापायचे.”
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “असो ते महत्वाचं नाही तर सांगायचं कारण हे की मी शूटला जाताना अचानक मला रस्त्यात एक केस कर्तनालय (सलून) दिसलं आणि त्याच्या नावाच्या बोर्डवर चक्क माझा फोटो लावला होता. त्यामुळे आता बहुतेक मुलं दुकानात जाताना बाहेरच ठरवत असतील की, कुणासारखे केस कापायचे.” यापुढे संतोषने “ये बाप्पू. साला अपून तो हिरो बनगया” असं लिहीत त्याचा हा आनंद व्यक्त केला आहे.