मुंबईत स्वत:चे घर घेण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि या स्वप्नपूर्तीसाठी प्रत्येकजण मेहनत करत असतो. गेल्या काही दिवसांत मराठीतील अनेक कलाकारांनी मुंबईत त्यांचं स्वत:चं घर घेत त्यांची स्वप्नपूर्ती केली आहे. रुचिता जाधव, पृथ्वीक प्रताप, सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी, केतकी माटेगांवकर, ऋतुजा बागवे यांनी नवीन घर घेतल्याची बातमी त्यांच्या चाहत्यांबरोबर शेअर केली. अशातच अभिनेत्री अश्विनी कासारनेही मुंबईत तिचं स्वत:चं नवीन घर घेतलं आहे. नुकताच तिने तिच्या नवीन घराचा एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. (Ashwini Kasar On Instagram)
नवीन घराच्या खरेदीचे काही खास क्षण शेअर करत तिने या व्हिडीओखाली तिच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत. यात तिने असं म्हटले आहे की, “आपण काम करत असलेल्या क्षेत्रामुळे व काम करत आहोत त्या शहरात हक्काचं स्वतःचं घर होणं. हे एक स्वप्न आहे. आणि कधी काळी पाहिलेलं स्वप्न आता प्रत्यक्षात उतरलं आहे. त्यामुळे आता माझ्या मनात खूप संमिश्र भावना आहेत. माझ्या वाढदिवशी हा आनंद द्विगुणीत करणारी गोष्ट तुम्हा सगळ्यांना सांगण्यासाठी हा शब्दप्रपंच करत आहे. काही वर्षांपूर्वी बदलापूरपासून सुरु झालेल्या माझ्या प्रवासामुळे दिवसाच्या शेवटी मी घरी पोहोचू शकायचे नाही. पण माझ्या मित्र मैत्रिणींनी, त्यांच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी मला कधीच घराची उणीव जाणवू दिली नाही. या सर्वांनी मला नुसतं घरच नाही तर ‘घरपण’ सुद्धा दिलं. त्यासाठी मी त्यांची कायम ऋणी आहे. तरीही माझ्या एकत्र कुटुंबाच्या प्रेमापोटी आणि ‘आपलं घर ते आपलं घर’ या भावनेपोटी मी बदलापूर गाठायचे.”
यापूढे तिने असं म्हटलं आहे की, “आज मला मी रात्री-बेरात्री केलेले प्रवास, माझ्या तब्येतीच्या तक्रारी, मनावर दगड ठेवून घेतलेले निर्णय आणि तरीही अभिनय क्षेत्रावरचं प्रेम, कामाप्रती श्रद्धा, जिद्द, आसू व हसू हे सगळं मला आता आठवत आहे. हे सगळं मला मौल्यवान वाटत आहे. या घराने आता आणखी कंबर कसून आणखी जास्त काम करण्याची ताकद दिली आहे. ‘मुंबई’ने आपलं म्हटल्याची भावना आता वाटत आहे. माझ्या घर मिळण्याच्या प्रवासात खूप जणांनी मदत केली आहे. त्या सगळ्यांचे मनापासून आभार. म्हाडा व महाराष्ट्र शासनाचेही आभार. तसेच तुम्हा सर्वांचे आशीर्वाद व प्रेम यांच्या प्रतीक्षेत मी व माझं घर कायम असू. भावना समजून घ्याल याची खात्री आहे.”
दरम्यान, अश्विनीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंट्स करत प्रतिसाद दिला आहे. मराठीतील अनेक कलाकारांनी तिला कमेंट्समध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री अपूर्वा गोरे, साक्षी गांधी, माधवी नेमकर, रुपल आनंद यांसारख्या अनेक कलाकार मंडळींनी तिला कमेंट्समध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अश्विनीच्या अनेक चाहत्यांनीसुद्धा या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये तिला तिच्या नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.