‘आई कुठे काय करते’ ही मालिका आजवर लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. अश्विनीला या मालिकेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील तिच्या अनघा या भूमिकेमुळे ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अभिनयाबरोबरच अश्विनी तिच्या फोटोशूटमुळे चर्चेत असते. हटके, पारंपरिक फोटोशूटमुळे अश्विनीला चाहत्यांचं विशेष प्रेम मिळालं आहे. (Ashvini Mahangade Post)
अभिनयाबरोबरच अश्विनी सामाजिक कार्यातही अधिक लक्ष देताना दिसते. समाजाप्रती, गड, किल्ले यांच्याविषयी असणारी अश्विनीची तळमळ नेहमीच पाहायला मिळते. महाराजांविषयी नेहमीच अश्विनीच्या मनात अपार श्रद्धा असलेली पाहायला मिळाली. कायमच ती महाराजांची महती सोशल मीडियावरून शेअर करताना दिसते. अश्विनीचा सोशल मीडियावरील वावरही बऱ्यापैकी मोठा आहे. नेहमीच काही ना काही खास पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
अशातच अभिनेत्रींच्या आणखी एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अश्विनी दर्शनासाठी थेट जेजुरी गडावर पोहोचली आहे. जेजुरी गडावर जाऊन दर्शन घेतानाचे फोटो तिने शेअर करत त्याखाली दिलेलं कॅप्शन साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. “यळकोट यळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. अखेर देवाने गडावर दर्शनासाठी बोलावलं. इतक्या वेळा जेजुरीहून कुठेतरी कार्यक्रमानिमित्त जाणे झाले, गेल्या वर्षी मन मंदिरा गजर भक्तीचा कार्यक्रमाचे वारीचे शूट जेजुरीच्या रस्त्यावर केले पण गडावर दर्शनासाठी जाणे झालेच नाही. मी जेव्हा तिथून जायचे आणि गड पाहायचे तेव्हा हेच मनात यायचे की देवाने अजून बोलावणे केलेच नाही. कधी योग येणार? कधी दर्शन होणार? आणि देवांनी सांगावा धाडला. दर्शन झाल्यावर जो आनंद झाला आणि तिथे जे जाणवले ते मांडता येणे कठीण” असं कॅप्शन देत तिने जेजुरी दर्शनाचा आनंद चाहत्यांसह शेअर केला आहे.
एक मेहनती, कष्टाळू, स्वाभिमान अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. आजवर अश्विनीने तिच्या अभिनयाच्या जोरावर तिचा असा स्वतःचा चाहतावर्ग तयार केला आहे. ‘आई कुठे काय करते’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणून अश्विनी महांगडेने संपूर्ण महाराष्ट्रात आपलं नाव कमावलं आहे.