Bigg Boss 17 Updates : ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. डोंगरीचा मुनव्वर फारुकी हा यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला. घरात आल्यापासूनच त्याच्या वैयक्तिक आयुष्यात व शोमध्येदेखील अनेक चढ उतार आल्याचे पाहायला मिळाले. पण आपल्या चाहत्यांच्या व शुभचिंतकांच्या पाठिंब्यामुळे मुनव्वरने ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले असं म्हणायला हरकत नाही.
‘बिग बॉस १७’चा विजेता मुनव्वरच होणार याचा त्याच्या चाहत्यांना विश्वास होता आणि अखेर चाहत्यांचा हा विश्वास खरा ठरला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं व उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे मुनव्वरवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अशातच या कमी मतांमुळे घरातून बाहेर पडलेल्या स्पर्धकांवर त्यांच्या चाहत्यांकडून सांत्वनपर पोस्ट केली जात आहे. अभिनेत्री अंकिता लोखंडेचा चाहतावर्गदेखील खूप मोठा आहे. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसह मराठमोळ्या अभिनेत्रींनीदेखील अंकिताला पाठिंबा दिला असल्याचे पाहायला मिळाले. मात्र ‘बिग बॉस’च्या अंतिम टप्प्यावर अंकिताचा प्रवास संपल्यामुळे अनेकांच्या पदरी निराशा पडली आहे.
अशातच अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील अंकिताच्या बाहेर जाण्याने निराश झाली असल्याचे पाहायला मिळाले. अभिनेत्री अमृता खानविलकरने अंकिता लोखंडे ‘बिग बॉस १७’च्या स्पर्धेतून बाहेर येताच इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली. या स्टोरीमध्ये अंकिता लोखंडे बाहेर झाल्याचं वृत्त असून त्यावर अमृताने “हृदय तुटलं” असं लिहिलं आहे.]
दरम्यान, अमृताने अनेकदा अंकितासाठी पाठिंबा दर्शवला असल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या एका भागातही अमृता ‘बिग बॉस’च्या घरात अंकिताला पाठिंबा द्यायला गेली होती. पण अंकिताच्या एक्झिटवर अमृता खूपच निराश झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.