Bigg Boss Season 17 Grand Finale Updates : छोट्या पडद्यावर गेले अनेक दिवस ज्याची जोरदार चर्चा सुरु होती तो लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस’. ‘बिग बॉस’च्या इतर पर्वांप्रमाणे यंदाचे १७वे पर्व विशेष गाजले. पहिल्या दिवसापासूनच या पर्वाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आणि अखेर ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा आज (२८ जानेवारी) रोजी पार पडला. यंदाच्या ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाच्या विजेते पदाचा दावेदार कोण होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
अशातच नुकतीच ‘बिग बॉस १७’च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली. ‘बिग बॉस’च्या १७व्या पर्वाच्या विजेते पदावर मुनव्वर फारुकीने आपले नाव कोरलं आहे. तर अभिषेक कुमारने दुसरे स्थान पटकावले आहे. ‘बिग बॉस १७’च्या विजेत्याला म्हणजेच मुनव्वर फारुकीला ‘बिग बॉस’च्या आकर्षक ट्रॉफीसह रोख रक्कम ५० लाख रुपये व एक अलिशान कारही बक्षीस म्हणून मिळाली आहे.
या महाअंतिम सोहळ्यात सर्वात आधी अरुण माशेट्टीचा प्रवास संपला. त्या पाठोपाठ या घरातून अंकिता लोखंडे ही स्पर्धक बाहेर पडली. त्यानंतर मनारा चोप्राने या शोला अलविदा केलं. मग दुसऱ्या क्रमांकावर अभिषेक कुमारने आपले स्थान कायम ठेवले आणि अखेरीस मुनव्वरने या पर्वाचे विजेतेपद पटकावले आहे.
दरम्यान, ‘बिग बॉस १७’चा विजेता मुनव्वरच होणार याचा त्याच्या चाहत्यांना विश्वास होता आणि अखेर चाहत्यांचा हा विश्वास खरा ठरला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं व उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच सोशल मीडियाद्वारे मुनव्वरवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.