Titeeksha Tawde Siddharth Bodke Wedding Updates : मराठी कलाविश्वामध्ये सध्या कलाकारांचं लग्न चर्चेचा विषय ठरत आहे. प्रथमेश परबच्या लग्नानंतर आणखी एका विवाहसोहळ्याची चर्चा सुरु झाली. तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडकेच्या लग्नानकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेरीस त्यांचा शाही विवाहसोहळा संपन्न झाल्यानंतर चाहत्यांनी दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पारंपरिक लूकमध्ये सिद्धार्थ व तितीक्षा अगदी सुंदर दिसत होते. दोघांच्या लग्नाचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता दोघांनी त्यांच्या लग्नामधील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तितीक्षा व सिद्धार्थ एकमेकांच्या प्रेमामध्ये आकंठ बुडालेले दिसत आहेत.
तितीक्षा व सिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये संपूर्ण लग्नसोहळ्याची झलक पाहायला मिळत आहे. निसर्गरम्य वातावरणात पार पडलेलं हे लग्न अगदी पाहण्यासारखं होतं. सिद्धार्थ एका घराच्या माडीवर उभा राहून तितीक्षाला मंडपात एन्ट्री करताना बघतो. तितीक्षाची नजर सिद्धार्थकडे जाते. तो तिला flying kiss देतो. हा सुंदर क्षण पाहून तितीक्षाला अश्रू अनावर झाले असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
स्वप्न सत्यात उतरत आहे हे पाहून तितीक्षाचे डोळे पाणावतात. बहीण खुशबू तावडे तितीक्षाला त्याचक्षणी मिठी मारते. तसेच उपस्थित मंडळी आनंदाने ओरडू लागतात आणि एकच जल्लोष करतात. या व्हिडीओचा लक्ष वेधून घेणारा आणखी एक क्षण म्हणजे लग्न लागताच तितीक्षा व सिद्धार्थ दोघंही भर मंडपात आनंदाने नाचू लागतात. आयुष्यभराचे साथीदार होण्याचा क्षण अनुभवणं म्हणजे नक्की काय? हे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येतं.
व्हिडीओच्या शेवटी सिद्धार्थ तितीक्षाला मिठी मारतो आणि म्हणतो, “आता मी तुला पहिल्यांदा बायको म्हणून हाक मारतो”. तितीक्षा सिद्धार्थच्या तोंडून बायको हा शब्द ऐकताच आनंदाने भारावून जाते. सिद्धार्थ-तितीक्षाच्या या व्हिडीओला काही मिनिटांमध्येच हजारो व्ह्युज मिळाले आहेत. तसेच चाहत्यांसह कलाकार मंडळींनी दोघांनाही नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.