सध्या मराठीसह हिंदी प्रेक्षकांना चित्रपट निर्मात्यांनी मनोरंजनाची मेजवानी आणली आहे. हिंदीमध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर, बॉबी देओल यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘अॅनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तर अभिनेता विकी कौशलचा ‘सॅमबहादूर’ या चित्रपटालादेखील चांगलीच पसंती मिळत आहे. अशातच नुकताच प्रदर्शित झालेला ‘झिम्मा २’ हा मराठी चित्रपटदेखील प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. ‘झिम्मा २’ हा मराठी चित्रपट महाराष्ट्रासह परदेशात प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. अनेक चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुल असे बोर्ड लागत आहेत. ‘अॅनिमल’ व ‘सॅमबहादूर’ या दोन चित्रपटांच्या आधी ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि त्याची अजूनही यशस्वी घोडदौड सुरु आहे. (Subodh Bhave On Instagram|)
याच चित्रपटाचे कौतुक करत अभिनेता सुबोध भावेने या चित्रपटाच्या टीमसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. सुबोध अनेकदा मराठी चित्रपटांना सहकार्य करत पाठिंबा दर्शवताना दिसतो. सोशल मीडियावर तो कधी त्याच्या कामाची माहिती देत असतो, तर कधी त्याचे काही खास फोटो शेअर करत असतो. अशातच त्याने ‘झिम्मा २’ या मराठी चित्रपटाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘झिम्मा २’ या चित्रपटाचा पोस्टर शेअर करत असे म्हटले आहे की, “आजूबाजूच्या हिंदी चित्रपटाच्या गर्दीत आमचा मराठी चित्रपट हाऊसफुल गर्दीत चालू आहे आणि याचा प्रचंड आनंद आहे.” यापुढे त्याने हा चित्रपट हाऊसफुल केल्याबद्दल प्रेक्षकांचे व इतका सुंदर चित्रपट बनवल्याबद्दल चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक करत त्यांना धन्यवादही म्हटले आहे.

‘झिम्मा २’ हा चित्रपट २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ०.९५ कोटीची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने १.७७ कोटी कमावले होते. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने २.०५ कोटींचा व्यवसाय केला. त्यानंतर चौथ्या दिवशी ०.७५ कोटींची भरघोस कमाई केली. पाचव्या दिवशी चित्रपटाने ०.५५ कोटीं कमावले. तर सहाव्या दिवशी ०.६९ कोटीचा गल्ला जमावल्यानंतर पुन्हा सातव्या दिवशी या चित्रपटाने ०.६५ कोटींची व्यवसाय केला. अशाप्रकारे पूर्ण आठवडाभरात चित्रपटाने एकूण ७.७१ कोटींची कमाई केली आहे.
त्यामुळे चित्रपटगृहात हिंदीतील दोन मोठ्या स्टार्सचे चित्रपट लागलेले असतानादेखील मराठीतला ‘झिम्मा २’ हा चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरत असून महिला प्रेक्षकवर्गामध्ये या चित्रपटाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. त्यामुळे हिंदीतील दोन मोठ्या चित्रपटांच्या गर्दीतही मराठीतला चित्रपट टक्कर देत असल्यामुळे दिग्दर्शक व कलाकारांचे कौतुक होत आहे.