अभिनय क्षेत्रात असे काही कलाकार असे आहेत जे त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्यातील बऱ्याच कलागुणांनी ओळखले जातात. सध्याच्या पिढीतील संकर्षण कऱ्हाडे याचंही नाव या पंक्तीत घेता येईल. संकर्षण एक उत्तम अभिनेता तर आहेच, पण एक संवेदनशील कवी, निवेदक, लेखक, दिग्दर्शकही आहे. संकर्षणच्या कविता ऐकणं ही तर रसिकांसाठी पर्वणीच असते असं म्हणणं वावगं ठरणार नाही. (Sankarshan Karhade Poem)
अशातच ‘झी मराठी’ वाहिनीच्या एका कार्यक्रमादरम्यान संकर्षणने म्हटलेल्या एका कवितेचा व्हिडीओ त्याने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यावेळी त्याने ‘नियम व अटी लागू’ नाटकाच्या परदेश दौऱ्यानिमित्त १३ प्रयोग केले. वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळे अनुभव त्याला आले याला अनुसरून संकर्षणने कविता केली आहे.
संकर्षणने केलेली कविता
फार गोड वाटते परदेशाची वारी
सिएटल मध्ये रिसिव्ह करायला कुणी आपलेपणाने येतं
हात दाखवत माहिती देत घरी स्वतःच्या नेत
उंबरठ्यावर मग तिथे घडतो अविस्मरणीय तो क्षण
त्यांच्या घरची गृहिणी करते प्रेमाने आमचं औक्षण
अहो जेव्हा सातासमुद्रापार मिळते मायेची ऊब खरी
तेव्हा फार गोड वाटते परदेशाची वारी
पुढे कॅन्सा सिटीमध्ये जाण्याचं ही प्रयोगचं कारण
तिथल्या घरी अंगणात तुळस, दारी झेंडूचं तोरण
जेव्हा दहा दिवस तिथे त्यांच्या घरी गणपती सण असतो
शाडूची मूर्ती करायला बाप मुलाला घेऊन बसतो
इतकंच नाही जेव्हा गोऱ्यांचं पोर यांच्या घरी येऊन
जयदेव जयदेव करी
तेव्हा फार गोड वाटते परदेशाची वारी
रॅलेमधला माणूस म्हणतो मी आहे तुमच्या गावचा
डॅलसमधली ताई म्हणते तू तर भाऊच वाटला आमचा
डॅलेव्हर मध्ये भरलेलं ताट समोर प्रेमाने येतं
आणि शिकागो सोडताना धपाट्यांची कुणी शिदोरीसोबत देतं
पिट्सबर्ग मधील कुटुंब जेव्हा भरल्या डोळ्यांनी टाटा करी
तेव्हा फार गोड वाटते परदेशाची वारी
आणि मग सर्वात शेवटी येतात प्रयोग
परदेशातही लांब लागते तिकिटांसाठी बारी
मराठी माणूस नाटक बघायला तुडुंब गर्दी करी
नवरा अगदी टापटीप आणि बायको साडीत भरजरी
मध्यंतरात तिथेही वडे आणि चहाची तरतरी
आणि प्रयोगानंतर जेव्हा टाळ्यांचा कडकडाट करी
तेव्हा फार गोड वाटते परदेशाची वारी
आणि एक कलाकार म्हणून मला असं वाटत
फार भाग्य की जन्माला कलाकार म्हणून आलो
कलाचं ठरली कारण इतक्या घरांशी जोडला गेलो
आता जबादारी जास्त माझं काम तुम्हाला कायम आवडत राहो
माझी नाटक, नाटकांत मी वर्षानुवर्षे येतं राहो
कलाकार प्रेक्षक हा स्नेह वाढो उराउरी
आणि अशीच छान घडत राहो परदेशाची वारी
संकर्षणच्या या परदेशवारीवरील कवितेच्या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत त्याच्या कवितेचं कौतुक केलं आहे.