सुप्रसिद्ध मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. ते ५८ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, आई असा परिवार आहे. अतुल यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण कलाविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचं अचानक निघून जाणं अनेकांसाठी धक्कादायक आहे. गेले दोन आठवडे अतुल यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांच्या प्राणज्योत मालवली. ऑक्टोबर २०२२मध्ये अतुल यांना कर्करोगाचं निदान झालं. मात्र त्यानंतर त्यांनी कर्करोगाला हरवण्याचा निश्चय ठाम केला. आजारपणामधून बाहेर पडल्यानंतरही त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र कर्करोगाशी सुरु असलेली त्यांची लढाई अपयशी ठरली आहे. (marathi actors on atul parchure death)
अतुल यांच्या निधनानंतर मराठी कलाविश्वालाही मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाद्वारे कलाकार मंडळी त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. No म्हणत सई ताम्हणकरने अतुल परचुरे यांचा फोटो शेअर केला आहे. तर दुसरीकडे सुव्रत जोशी याने पोस्ट शेअर केली आहे. तो म्हणाला, “अतुल परचुरे सर तुम्ही किती धीराने लढलात. तुमची कला, जगण्याची प्रबळ इच्छा नेहमीच प्रेरणादायी ठरेल. पण खूप खूप वाईट वाटत आहे”.
“अतुल परचुरे सारखा कलाकार आणि मित्र गमावल्याचं दुःख खूपच त्रासदायक आहे. त्याला आम्ही कधीच विसरु शकणार नाही. भावपूर्ण श्रद्धांजली”, असं सचिन पिळगांवकर यांनी म्हटलं आहे. तर सुप्रिया पिळगांवकर यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “लाडक्या मित्रा असं व्हायला नको होतं. खूप लढलास. खूप सहन केलंस. तुझी उणीव सदैव भासणार. तुझ्या खट्याळ हास्याची आठवण सदैव राहिल. तुझ्या आत्म्यास शांती लाभो. कुटुंबियांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो”.
शुभांगी गोखले, अमोल कोल्हे यांसारख्या अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहत दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच त्यांच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाल्याचेदेखील अनेक कलकारांनी म्हंटले आहे. ‘अलीबाबा आणि आणि चाळीशीतले चोर’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला.