मराठी चित्रपट सृष्टीने नुकत्याच एका अभिनेत्याला गमावले आहे. अभिनेते अतुल परचुरे यांचे कर्करोगाने निधन झाल्याचे समोर आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यावर कर्करोगासंबंधी उपचार सुरु होते. मात्र त्यांची कर्करोगाशी असलेली झुंज ही अपयशी ठरली आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. अतुल हे नेहमीच आपल्या मस्त-बिनधास्त स्वभावाने सर्वच ठिकाणी एक खेळीमेळीचे वातावरण निर्माण करायचे. त्यामुळे अनेकांना त्यांच्या जवळचाच एक व्यक्ती गेल्याची भावना सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनीदेखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. (ashok saraf on atul parchure death)
अतुल यांच्या निधनानंतर संपूर्ण मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. अशातच त्यांचे चांगले मित्र व सह-कलाकार अशोक सराफ यांनी आपल्या भावना ‘एबीपी माझा’ बरोबर बोलताना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले की, “आताच मला ही बातमी कळाली. आमच्या नात्याच्या दृष्टीने आणि मराठी इंडस्ट्रीसाठी अत्यंत वाईट गोष्ट घडली आहे. एक चांगला अभिनेता इंडस्ट्रीने गमावला आहे. ही सहन न करण्यासारखी गोष्ट आहे. खूप छान नट होता. असं घडायला नको होतं. त्याचं जाणं सतत मला दुःख देत राहिल. यावर काय बोलावं हेच मला कळत नाही. शब्दच सुचत नाहीत. माझा अत्यंत जवळचा मित्र होता. खिचडी नावाच्या चित्रपटात माझं लहानपण अतुलने पडद्यावर आणलं होतं”.
आणखी वाचा – Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्ते शोमधून बाहेर?, असं नक्की काय घडलं? घरात मोठी भांडणं
दरम्यान आता अतुल यांच्या निधनाने सगळ्यांना खूप दु:ख झाल्याचे समोर आले आहे. आजवर त्यांनी ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आम्ही सातपुते’, ‘सून लाडकी सासरची’ तसेच हिंदी चित्रपट ‘क्या दिल ने कहा’ या चित्रपटांमध्ये एकत्रित भूमिका साकरल्या.
अतुल यांच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे. तसेच त्यांचे निधन हे अनपेक्षित होते असेही त्यांच्या जवळच्या माणसांनी सांगितले आहे.