सुप्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वावर शोककळा परसरली आहे. मालिका, नाटक, चित्रपट या तिन्ही माध्यमांमधून त्यांनी प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. दोन वर्षांपूर्वी अतुल यांना कर्करोगाचं निदान झालं. त्यानंतर त्यांनी या आजाराशी दोन हात केले. दरम्यान त्यांच्यावर उपचारही सुरु होते. कर्करोगावर मात करत त्यांनी अभिनयक्षेत्रात नाटकाद्वारे कमबॅकही केलं. मात्र गेले दोन आठवडे अतुल यांची तब्येत खालावली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच अतुल यांनी अखेरचा श्वास घेतला. काही महिन्यांपूर्वी अतुल यांच्या पत्नीने त्यांच्या आजारपणाचे दिवस याबाबत भाष्य केलं होतं. (atul parchure wife)
आजारपणामध्ये अतुल यांच्याबरोबर हिंमतीने उभ्या होत्या त्या म्हणजे त्यांच्या पत्नी सोनिया परचुरे. अतुल यांच्या पाठीशी त्या ठामपणे उभ्या राहिल्या. याचबद्दल सोनिया परचुरे यांनी ‘आरपार’शी संवाद साधला होता. सोनिया यांनी म्हटलं होतं की, “अतुल हा माझ्यासाठी पहिल्यापासूनच हिरो होता. त्यामुळे मला माझ्यापेक्षाही अतुल ज्या परिस्थितीमध्ये डॉक्टरांचं शांतपणे ऐकायचा ते पाहून जास्त वाईट वाटलं. कारण तुम्ही काहीतरी म्हणालात आणि अतुलने ते शांतपणे ऐकून घेतलं, असं कधीच होत नाही. एखादा आजार तुम्हाला किती असाह्य करुन जातो, हे मला तेव्हा कळालं”.
यापुढे त्यांनी असं म्हटलं की, “एका टप्प्यावर अतुलचा आवाज गेला. मी डॉक्टरांना म्हटलं की, अहो अतुलचा आवाज गेला. त्याचा आवाज जाऊन नाही चालणार. अतुलचा आवाज खूप महत्त्वाचा आहे. तेव्हा ते मला फक्त हो मी समजू शकतो असं म्हणाले. त्याची ती अवस्था पाहून मला सतत वाटायचं की मी याला कसं यातून बाहेर काढू. आपण किती बायको वैगरे सगळं असलो तरीही त्या व्यक्तीला ज्या यातना होत असतात त्यातून त्याला आपण नाही बाहेर काढू शकत. त्यावेळी आपण हतबल होतो. तेव्हा मला असं वाटत होतं की आपण कितीही स्वतःला शहाणे समजत असलो जसं की मी हे करीन… मी ते करीन… पण इथे आपण काही करू शकत नाही”.
यापुढे सोनिया यांनी चाहत्यांच्या प्रेमाबद्दल व या काळात चाहत्यांनी अतुल यांच्यासाठी केलेल्या प्रार्थनेबद्दल त्यांनी असं म्हटलं की, “खूप लोकांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या. अनेक लोक फक्त अतुल बरा झाला पाहिजे असं म्हणत होते. भरपूर लोकांनी मला त्यावेळी फोन केले. लोक कुठेतरी जायचे. सोरटी सोमनाथ, गिरनार वगैरे ठिकाणांची नावे घ्यायचे आणि तिथे जाऊन अतुलसाठी प्रार्थना करायचे”. अतुल यांच्या अचानक जाण्याने कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला आहे.