झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या माध्यमातून सागर कारंडे हे नाव घराघरांत पोहोचलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सागरने कधी प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे, तर कधी पोस्टमन काका बनून रडवलंही आहे. अरविंद जगताप यांनी लिहिलेली पत्रे सागरने त्याच्या खास शैलीत सादर करत एकाचवेळी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणि चेहऱ्यावर हसू आणण्याचं काम सागरने अचूकपणे केले आहे. (Saagar Karande On Instagram)
सागर त्याच्या विनोदी अभिनयाने जितका चर्चेत असतो. तितकाच तो सोशल मीडियावदेखील सक्रिय असतो. सोशल मीडियाद्वारे तो त्याच्या कामानिमित्त काही फोटो पोस्ट करत असतो तर कधी त्याचे वैयक्तिक फोटो व व्हिडीओदेखील शेअर करत असतो. अशातच काल (१ जानेवारी) रोजी सागरचा वाढदिवस होता आणि या वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन त्याने त्याच्या नाटकातल्या कलाकारांबरोबर साजरा केला. रंगभूमीवर त्याचे सध्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ हे नाटक चालू असून या नाटकाच्या प्रयोगानिमित्त तो प्रवास करत असताना नाटकाच्या बसमध्येच त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
आणखी वाचा – मावळता सूर्य, रोमँटिक गप्पा अन्…; एकमेकांच्या प्रेमात हरवले नारकर कपल, खास व्हिडीओ केला शेअर
अभिनेता दरवर्षी त्याच्या वाढदिवसाला नाटकाचा प्रयोग करत वाढदिवस साजरा करतो आणि यंदाही त्याने हीच पद्धत कायम ठेवत त्यांचा यंदाचा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याच्या नाटकाची संपूर्ण टीम होती. नाटकाच्या संपूर्ण टीमसह सागरने नाटकाच्या बसमध्येच केक कापत मोठ्या उत्साहात व जल्लोषात त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवस व नवीन वर्षांचा पहिला दिवस असा सुंदर योग जुळून येत असल्यामुळे त्यादिवशी प्रयोग केल्याने एक नवीन ऊर्जा मिळते असं तो आवर्जून सांगतो.
दरम्यान, सागर सध्या ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ या नाटकातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्याच्या नाटकाला प्रेक्षकांचादेखील तुफान प्रतिसाद मिळत आहे. सध्या या नाटकाची १५०व्या प्रयोगाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. अशातच सागर येत्या काळात काही नवीन चित्रपटांतूनदेखील चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना याची चांगलीच उत्सुकता लागली आहे.