सिनेसृष्टीत एकामागोमाग एक चित्रपट येत आहेत. बॉलिवूडप्रमाणे आता मराठी चित्रपटांनाही प्रेक्षकांची पसंती मिळालेली पाहायला मिळत आहे. निर्माते उत्तम कथानक घेऊन चित्रपटसृष्टीत येत आहेत आणि असलं तरी मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नसल्याची बोंब सर्वत्र असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक कलाकार मंडळी या मुद्द्यावरून भाष्य करताना दिसले आहेत असं असलं तरी चित्रपट निर्माते तितक्याच ताकदीने चित्रपट बनवून प्रेक्षकांच्या भेटीस आणत असतात. (Pushkar Jog On Marathi Film Producer)
चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणं, प्रेक्षक विभागला जाणं आणि कालांतराने त्या चित्रपटांना स्क्रीन न मिळणं यासाठी चित्रपट निर्मात्यांनी एकमेकांसह चित्रपटाच्या तारखांबाबत भाष्य करणं आवश्यक असतं. मात्र सहसा असं मराठी चित्रपटसृष्टीत होताना दिसत नाही, यावरून मराठमोळ्या अभिनेत्याने केलेली पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून पुष्कर जोग आहे. पुष्करने आजवर त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
पुष्कर नेहमीच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याला न पटलेल्या गोष्टी स्पष्टपणे मांडत असतो. अशातच पुष्करने केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पुष्करने स्टोरी पोस्ट करत एका मराठी चित्रपटाच्या निर्मात्याला टोला लगावला आहे. ‘मुसाफिरा’ हा पुष्करचा नवा चित्रपट पुढील वर्षी २ फेब्रुवारी २०२४ ला प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा पार पडला. चित्रपटात पुष्कर जोगसह अभिनेत्री पूजा सावंत मुख्य भूमिकेत असल्याचं पाहायला मिळणार आहे.
पुष्करने ‘श्रीदेवी प्रसन्न’ या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनावरून ही पोस्ट केली आहे. ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ ला प्रदर्शित होणार असून काल या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. यावरून पुष्करने चित्रपट निर्मात्यांवर रोष दाखवत एक पोस्ट शेअर केली आहे. एकाच वेळेला दोन मराठी चित्रपट आल्याने दोन्ही चित्रपटांचं केवळ नुकसान आहे. त्यामुळे किमान निर्मात्यांनी तरी संवाद साधून चित्रपट प्रदर्शनाची तारीख ठरवावी या आशयाने त्याने ही पोस्ट केली आहे. ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपटात सई ताम्हणकर, सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत आहेत. पुष्करने श्रीदेवी प्रसन्न चित्रपटाची पोस्ट शेअर करत राग व्यक्त केला आहे.
पुष्करने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की, “दोन दिवसापूर्वी आम्ही ‘मुसाफिरा’ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. आणि या चित्रपटाची तारीख काल प्रदर्शित झाली. निर्माते एकमेकांसह का संवाद साधत नाहीत. फोन, मेसेज करून का बोलत नाहीत. एकत्र चित्रपट प्रदर्शित होणे टाळण्यासाठी मी चित्रपट प्रदर्शनाच्या तीन महिने आधी प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. हे योग्य नाही. विनंती आहे की, कृपया तुम्ही तुमच्या चित्रपटाची तारीख बदला वा पुढे घ्या” असं म्हणत त्याने चित्रपट निर्मात्यावर रोष व्यक्त केला आहे.