महाराष्ट्राचे महानायक ‘महाराष्ट्र भूषण’ म्हणजेच प्रेक्षकांचे लाडके अभिनेते अशोक सराफ लवकरच छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशोक सराफांनी आजपर्यंत हिंदी, मराठी अशा वेगवेगळ्या भाषांतील सिनेविश्वावर अधिराज्य केलं आहे. एक वेगळा विषय करायला मिळत आहे म्हणून ते पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. रिटायरमेंटच्या वयात असलेले अत्यंत शिस्तप्रिय, काटेकोरपणे वागणारे असे अशोक मा. मा. आणि त्यांच्याबरोबर येणारे अनेक धमाल मजेदार अनुभव, त्यातून उलगडत जाणारं अशोक या पात्राचं भावविश्व या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. (Ashok Saraf on Television Comeback)
काल (२५ नोव्हेंबर) पासून अशोक सराफांची ‘अशोक मा. मा.’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. २००६ मध्ये त्यांची लोकप्रिय हिंदी मालिका ‘हम पांच’ संपली. तेव्हा त्यांनी मालिका विश्वातून रजा घेतली. त्यानंतर ते छोट्या पडद्यावर मालिकेमध्ये कधी दिसले नाहीत. पण आता अनेक वर्षांनी अशोक सराफांना पुन्हा एकदा छोट्या पडद्याने खुणावलं आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘अशोक मा. मा.’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मात्र इतक्या वर्षांनी त्यांनी मालिका विश्वात येण्याचा निर्णय का घेतला? याबाबत ‘इट्स मज्जाच्या’ मुलाखतीत भाष्य केलं आहे.
यावेळी अशोक सराफांनी असं म्हटलं की, “‘हम पांच’नंतर मी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. खरंतर मी कमबॅक करणार नव्हतो. कारण मुळात मला Daily (रोज) हा प्रकार आवडत नाही. यात चूक कुणाची नसते, पण लेखकांचा विचार केला तर ते लिहून लिहून किती लिहिणार? आणि कलाकार म्हणून देऊन देऊन किती विविधता देणार? असा प्रश्न पडतो. त्यामुळे शेवटी-शेवटी ते धोबीकाम होत जातं. मला हे असं नको होतं. आमच्यावेळी आम्ही आठवड्यातून एक किंवा दोनदा शूट करायचो. त्यामुळे ते बरं होतं. चार-चार किंवा सहा-सहा दिवसांचे एपिसोड केलेले बरे वाटायचे”.
यापुढे ते असं म्हणाले की, “आता जास्त शूटिंग करावं लागतं आणि यात माणूस अगदी गारच होतो. तो पूर्ण थकून जातो. त्यामुळे मी मालिका करायची नाही असं ठरवलं होतं. पण शेवटी माझ्याकडे आता वेळ आहे आणि मुळात मला ही कथा आवडली म्हणून मी मालिका करत आहे”. दरम्यान, लेखक चिन्मय मांडलेकरच्या लेखणीतून साकारलेली ‘अशोक मा.मा.’ ही मालिका मजेदार, खुमासदार आहे. मालिकेत अशोक मामांसह ‘कलर्स मराठी’च्या ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’मधील रसिका वाखारकर, नेहा शितोळे, चैत्राली गुप्ते आणि काही इतर कलाकारदेखील झळकणार आहेत.