बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच तिच्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत असते. मात्र अभिनेत्री तिच्या कामाशिवाय वैयक्तिक कारणांमुळेच अनेकदा चर्चेत आली आहे. मलायकाने वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी अरबाज खानबरोबर लग्न केले. मात्र १९ वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अशातच आता मलायकाने इतक्या वर्षांनंतर तिच्या घटस्फोटावर मौन सोडले आहे आणि अरबाजपासून वेगळे झाल्यानंतर तिला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले याबद्दल सांगितले आहे.
मलायकाने अरबाजपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिला अनेक वाईट प्रसंगांना सामोरे लावे लगल्याचे म्हटले. याचदरम्यान मलायकाला घटस्फोटामध्ये पोटगी म्हणून मिळलेल्या पैशांमुळे ती इतके महागडे कपडे परिधान करत असल्याच्यादेखील अनेक चर्चा रंगल्या होत्या. यावर आता अभिनेत्रीने सडेतोड उत्तर दिलं आहे. नुकत्याच पिंकविलालं दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या घटस्फोटाबद्दल भाष्य केले आहे.
यावेळी मलायका असं म्हणाली की, “काही वर्षांपूर्वी माझ्याविषयी छापून आलेल्या एका लेखात एका व्यक्तीने मला घटस्फोटात पोटगी म्हणून खूप पैसे मिळाले होते म्हणून मी महागडे कपडे परिधान करते असं म्हटलं होतं. मला हे वाचून खूपच धक्का बसला होता. मला याचे खूपच वाईट वाटले होते. मला वाटतं एखाद्याची आर्थिक स्थिती ही त्याच्या भूतकाळातील निर्णयावर कधीच अवलंबून नसते”.
यापुढे “तुम्ही आयुष्यात काहीही केले, कुठेही पोहोचलात, याने काहीच फरक पडत नाही. कारण लोकांच्या मते तुम्ही जे कुणी आहात ते तुम्हाला मिळालेल्या पोटगीमुळेच. तुमच्या कामाला आणि मेहनतीला काहीच किंमत नसते” असं म्हणत सडेतोड उत्तर दिलं आहे.
दरम्यान, मलायका तिच्या घटस्फोटाच्या निर्णयाबद्दल असं म्हणाली की, “मला माझ्यासाठी, माझ्या करिअरसाठी, माझ्या आवडी-निवडीबद्दल घटस्फोट घेणे जरूरी वाटले. मला माझ्या मुलाला आनंदी ठेवायचे असेल तर मला आतून ठीक वाटले पाहिजे. त्यामुळे मी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाकडे प्रत्येकजण वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतो”.