मराठीसह हिंदी सिनेविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते म्हणजे किरण करमरकर. २००० सालच्या ‘कहाणी घर घर की’ या मालिकेतील ओम आगरवालच्या भूमिकेने किरण करमरकरांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये व चित्रपटांमध्ये अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. अशातच अभिनेते त्यांच्या ‘आर्टिकल ३७०’ चित्रपटातील एका भूमिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
किरण करमरकर यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी बरीच पसंती दर्शवली आहे. त्यांचा अमित शाह यांच्या भूमिकेतील लूक सध्या व्हायरल होत असून त्यांच्या अभिनयाचेदेखील विशेष कौतुक होत आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने संवाद साधण्यासाठी किरण करमरकर यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘हॅशटॅग ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
आणखी वाचा – “आम्ही गुपचुप लग्न…”, आदिल खानबरोबरच्या नात्याबद्दल सोमी खानची प्रतिक्रिया, म्हणाली, “नकारात्मकता, वाद…”
यावेळी करमरकरांना “अशा प्रकारच्या चित्रपटांना बऱ्याचदा ‘प्रचारकी’ (प्रोपगंडा) चित्रपट म्हटले जाते, याबद्दल तुम्हाला काय वाटतं?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत त्यांनी असे म्हटले की, “मला हा प्रचारपट वाटत नाही. तुम्ही फक्त ट्रेलर किंवा पोस्टर बघून ठरवणार असाल तर ते तुमचं दुर्दैव आहे. पण तटस्थ प्रेक्षक म्हणून चित्रपट पहिल्यानंतर लक्षात येते की, यापैकी काही गोष्टी आपल्याला माहीतच नव्हतं. ही एक घडलेली घटना आहे. हे आपल्या देशामध्ये झालं आहे. देशात कलम ३७० कसं हटवण्यात आलं? तेच या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.”
यापुढे ते असं म्हणाले की, “प्रचारकी चित्रपट तेव्हाच होतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल काही गोष्टी वाढवून सांगितल्या जातात. मात्र या चित्रपटात त्या दोघांबद्दल (गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी) काहीही सांगण्यात आलेलं नाही. यामी गौतम ही या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री आहे, खरंतर खऱ्या घटनेत तिचा काहीही संबंध नाही, पण चित्रपटात ती काल्पनिक पात्र म्हणून दाखवण्यात आली आहे. त्यामुळे यात प्रचार असण्याचा काही संभवच येत नाही. जे घडलं आहे तेच या चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे.”