सध्या रंगभूमीवर गाजत असलेले ‘कुर्रर्रर्रर्र’ हे नाटक विशेष चर्चेत आले आहे. विशाखा सुभेदार यांनी या नाटकांत काही बदल करणार असल्याची एक पोस्ट त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली होती. त्यामुळे या नाटकादरम्यान नेमका कोणता बदल होणार याकडे साऱ्यांचा नजरा लागून राहिल्या होत्या. त्यानंतर त्यांनी या नाटकातून अभिनेत्री नम्रता संभेराव व अभिनेता प्रसाद खांडेकर यांची एक्झिट होत असल्याचं सांगितलं. त्यांनतर आता प्रसादने या नाटकांतून एक्झिट केल्यानंतर पहिल्यांदाच याबाबतची पोस्ट सोशल मीडियावरून शेअर केली आहे. (Prasad Khandekar on kurrrr Play)
प्रसादने ‘कुर्रर्रर्रर्र’ नाटकाचं नवं पोस्टर शेअर केलं आहे. यासह कॅप्शन देत त्याने लिहिलं आहे की, “नाटकातील बदलावरून खुप मेसेज, फोन आले त्यांच्यासाठी हा लेखप्रपंच. या बदलाचा निर्णय अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात, सगळ्या टीमबरोबर चर्चा करून सामोपचाराने घेतला आहे. माझ्या आयुष्यातील अत्यंत जवळचं व महत्वाचं नाटक. व्यावसायिक रंगभूमीवर ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ पुरस्कार मिळवून देणारं पहिलं नाटक. ‘कुर्रर्रर्रर्र’च्या या सव्वा दोनशे प्रयोगात तुम्ही रसिकांनी उत्तम साथ दिली. खुप प्रेम केलं .साधारण कोव्हिड काळात सुरू केलेलं नाटक फक्त व फक्त तुम्हा रसिकांच्या प्रेमामुळे टिकलं” असं त्याने म्हटलं आहे.
यापुढे प्रसादने, “अत्यंत व्यस्त शेड्युलमधून नाटक करण्याचा निर्णय घेतला तो फक्त नाटकाच्या प्रेमाखातरचं . शूटिंग व इतर बऱ्याच गोष्टी सांभाळत तारेवरची कसरत करत गेल्या दोन वर्षात हे सव्वा दोनशे प्रयोग केले. खूप दमछाक होत होती पण टीममधील कलाकार मुख्यत्वे बॅकस्टेज टीम यांचा विचार करता लक्षात येऊ लागलं फक्त आपल्यामुळे प्रयोगांची संख्या कमी होत आहे. जिथे नाटकाचे १० ते १२ प्रयोग होऊ शकतात तिथे फक्त आमच्या तारखांमुळे ५ ते ६ प्रयोग होत आहेत हे लक्षात आलं आणि आपल्यामुळे कलाकारांवर तसेच बॅकस्टेज टीमवर अन्याय नको म्हणून show must go on नुसार अगदी दोन महिने आधी ठरवून सर्वानुमते टीमने एकत्र चर्चा करुन हा बदल करायचं ठरवलं. हा बदल नेहमी चांगलंच घडवतो आणि हा बदल तर अगदी जवळचा आहे. प्रियदर्शन व मयुरा दोघेही खुप जवळचे मित्र आहेत. ‘कुर्रर्रर्रर्र’चा गाडा दोघे आणखी उत्तमच हाकतील याची खात्री आहे” असंही म्हणाला आहे.
यापुढे त्याने लिहीत, “आत्तापर्यंतच्या प्रवासासाठी सगळ्या टीमचे, कलाकारांचे, बॅकस्टेज कलाकारांचे पॅडी, गोट्या काका, हेरंब, विशाखा ताई, सुनील, महेश दादा, युजे, पूनम ताई, नम्रता आणि सर्वात महत्वाचे तुम्ही मायबाप रसिक प्रेक्षक. तुम्हा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. ‘कुर्रर्रर्रर्र’ मधून, रंगमंचावरून थोडा लांब गेलो असलो तरी लेखक-दिग्दर्शक म्हणून ते माझंच अपत्य आहे. ज्या कलाकृतीवर मनापासून प्रेम केलं आणि ज्या कलाकृतीने भरभरून दिलं अशी सुरू असलेली कलाकृती सोडून जाणे हे खुप त्रासदायक असतं पण प्रसंगी नवीन काही करण्यासाठी असे कटू निर्णय घ्यावे लागतात. बाकी आजपर्यंत ‘कुर्रर्रर्रर्र’वर जितकं प्रेम केलंत तितकंच किंबहुना त्यापेक्षा अधिकचं प्रेम यापुढे कराल याची खात्री आहे. नाटक घडत राहो. रंगभूमी व नाटकापासून फार काळ लांब राहू शकत नाही. सगळ्या टीमचा विचार करून आणि व्यवस्थित शेड्युल करून लवकरचं पुन्हा नवीन नाटक घेऊन येईन” अशी लक्षवेधी पोस्ट केली आहे.