सध्या बंगालच्या उपसागरात मिचाँग चक्रीवादळाने बराच थैमान घातला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम तामिळनाडुसह आसपासच्या इतर राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. या चक्रीवादळामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तामिळनाडूतील लोकांचं जीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. या पूराचा फटका बॉलिवूड सूपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनाही बसला. त्यांच्या चेन्नईमधील बंगल्याला पुराच्या पाण्यानं वेढलं आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (rajinikanth house affected by Chennai floods)
मुसळधार पावसामुळे चेन्नईमधील बरीच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांची घरं पाण्याखाली गेली असून तिथल्या लोकांचे प्यायच्या पाण्याचेही हाल झाले आहेत. चेन्नईच्या व्हिआयपी भागातही या पूराचा परिणाम पाहायला मिळाला. रजनीकांत यांच्याही घरात पाणी शिरलं आहे. पण या पूरजन्य परिस्थितीच्या दरम्यान रजनीकांत त्यांच्या चेन्नईच्या घरी नव्हते. रिपोर्टसनुसार, रजनीकांत सध्या चेन्नईच्या बाहेर तिरुनेलवेलीमध्ये आहेत. जिथे त्यांच्या नवीन चित्रपटाचं म्हणजेच ‘थलैवर १७०’चं शुटिंग चालू आहे.
Poes Garden near @rajinikanth house @Savukkumedia @SavukkuOfficial #ChennaiFloods2023 #ChennaiRains2023 #chennaicyclone #சென்னையை_மீட்ட_திமுக pic.twitter.com/tHiYTrFsW2
— Abdul Muthaleef (@MuthaleefAbdul) December 6, 2023
रजनीकांत यांच्या कुटुंबियांनाही त्यांच्या चेन्नईतील बंगल्यामधून दुसरीकडे स्थलांतरीत करण्यात आलं आहे. त्यांच्या घरी पाणी भरलं असल्याचा हा व्हिडीओ त्यांच्या एका चाहत्यांने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे रजनीकांत यांच्या चाहत्यांना रजनीकांत या पूरात अडकले असल्याचा समज झाला होता. या पूरात अलीकडे अभिनेता आमिर खान व विष्णू विशाल हे अडकले होते. यादरम्यानचे काही फोटो विष्णू विशालने शेअर केले होते. त्यात तो व आमिर बचाव बोटीत पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्याबरोबर विष्णू विशालची पत्नी व बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाही होती. हा फोटो शेअर करत विष्णू विशाल यांनी बचाव पथकाचे आभार मानले.
रजनीकांत यांच्यासह चेन्नईच्या पूरात बरेच दाक्षिणात्य कलाकारांना फटका बसला आहे. त्यात अभिनेत्री नमिता, विनोदिनी वैद्यनाथन, आदिती बालन, शंतनू व आत्मिका यांचा समावेश असल्याचं समोर येत आहे. पाऊसाचा प्रभाव जरी कमी झाला असला तरीही अनेक भागात पाणी अजूनही कमी झालेलं नाही.