‘बिग बॉस १७’ची सर्वत्र चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस’ मुळे यंदाचे सर्वच स्पर्धक विशेष चर्चेत आलेले पाहायला मिळत आहेत. अशातच ‘बिग बॉस’च्या घरातील अभिनेत्री अंकिता लोखंडे व विकी जैन सीजनच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत आले आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात अंकिता व विकीमध्ये होणारे वाद तसेच त्यांचं प्रेम पाहून प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. (Ankita Lokhande Troll)
अंकिता लोखंडेने काही दिवसांपूर्वी तिचा एक्स बॉयफ्रेंड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबद्दल भाष्य केलं होतं. यावेळी अंकिताने सुशांतबरोबरच्या ब्रेकअप होण्याचं कारण सांगितलं होतं. त्यानंतर अंकिता अभिषेकसह सुशांतबद्दल बोलताना रडताना दिसली. तेव्हा अभिषेकम्हणतो, “त्याचा प्रवास, पार्श्वभूमी ही सुशांतसारखीच आहे.” यावर अंकिता म्हणते की, “पण तो इतका रागिष्ट नव्हता. सुशांत खूप शांत होता. त्याचा प्रवास कसा चांगला होईल याकडे तो अधिकाधिक लक्ष देई. तो खूप मेहनती होता. ती व्यक्तीच वेगळी होती. तो मेहनतीच्या बाबतीत अव्वल होता. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर अधिक मेहनत घेता, त्या गोष्टीच्या खोलात शिरता आणि तेव्हा जर का काही कमी जास्त जाणवलं तर त्याच्या परिणामही तुमच्यावर होतो. मी खूप सहज व सोप्पी आहे. पण सुशांत प्रत्येक गोष्टीत गुंतून जायचा” असंही ती म्हणाली.
अंकिता पुढे, “त्याला हवं ते मिळवण्यासाठी तो काहीही करायचा. आणि त्यात थोडंसं वर-खाली झालं तर त्याला काळजी वाटायची. ट्विटरवर लोक त्याच्याबद्दल काय बोलत आहेत याचाही तो विचार करत बसायचा. तो एकदम लहान गावातून आलेला मुलगा होता. त्यामुळे भावनिक दृष्ट्या असा विचार करणं त्याच्यासाठी साहजिक होतं. एवढ्या मोठ्या क्षेत्रात नाव कमावणे सोपे नाही.” असं म्हणत अंकिता रडायला लागली. त्यानंतर अभिषेक अंकिताला म्हणाला की, “मी आता सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलणार नाही.” तेव्हा अंकिता म्हणाली, “नाही, ठीक आहे. त्याच्याबद्दल बोलायला बरं वाटतं. मला त्याचा खूप अभिमान वाटतो. तो माझं कुटुंब आहे” म्हणाली.
अंकिताच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलेलं पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत, “फुटेजसाठी सुशांतचा वापर करते” असं म्हटलं आहे. तर आणखी एकाने, “नॉमिनेट झाली आहे म्हणून सुशांतच्या फॅन्सकडून हिला वोटची अपेक्षा असल्याचं म्हटलं आहे”. तर आणखी एकाने “सुशांतबद्दल बोलून सहानुभूती मिळवू नकोस” असं म्हटलं आहे. तर आणखी एका युजरने, “नॉमिनेशनची प्रक्रिया आली की, ती सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलते” असं म्हटलं आहे.