अभिनेत्री नम्रता संभेराव व अभिनेता प्रसाद खांडेकर यांनी कुर्रर्रर्रर्र नाटकातून एक्झिट घेतली असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. विशाखा सुभेदार यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावरून पोस्ट करत शेअर केली. त्यानंतर आता प्रसाद खांडेकरने नाटकातून एक्झिट केल्याबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलं, व नाटकाच्या आगामी प्रयोगांसाठी शुभेच्छाही दिल्या. त्यापाठोपाठ आता अभिनेत्री नम्रता संभेरावनेही नाटकातून एक्झिट घेतल्यानंतर खास पोस्ट शेअर केली आहे. (Namrata Sambherao On Kurrrr)
नम्रताने नाटकातून एक्झिट घेतल्यानंतर पहिल्यांदाच पोस्ट शेअर करत, “‘कुर्रर्रर्रर्र’. माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचं नाटक. या नाटकातील माझी भूमिका मी अक्षरशः जगले. माझ्या आयुष्यातील अभिनयाचं पहिलं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं बक्षीस याच नाटकाने मला मिळवून दिलं. कोविड काळानंतर आम्ही कलाकारांनी एकमेकांच्या विश्वासावर उभं केलेलं हे नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. अत्यंत व्यस्त श्येड्युलमधून आम्ही ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकाचे २ वर्षात २०० हुन अधिक प्रयोग केले. पण व्यस्त तारखांमुळे प्रयोगांची संख्या कमी झाली” असं म्हटलं.
यापुढे तिने, “बॅकस्टेज व आमच्या सहकलाकारांना जास्तीत जास्त प्रयोग करता यावेत आणि नाटकाचे आणखी भरघोस प्रयोग व्हावेत यासाठी सर्वानुमते घेतलेला हा निर्णय आहे. काळजावर दगड ठेवून घेतलेला निर्णय काय असतो हे पहिल्यांदा अनुभवलं पण हा निर्णय चांगल्या भावनेने घेतला गेला आहे. नाटकासाठीचं घेतला आहे. तुम्ही रसिक प्रेक्षक आमच्या निर्णयाचा मोठ्या मनाने स्वीकार कराल अशी खात्री आहे. यापूर्वी जसं प्रेम केलंत तसंच प्रेम तुम्ही रसिक प्रेक्षक आमच्या ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकावर, नवीन संचावर कराल अशी अशा आहे” असंही म्हटलं.
पुढे नम्रताने शुभेच्छा देत, “मी अजूनही म्हणत आहे की, कारण शारीरिकरित्या एक्झिट घेतली तरी त्या नाटकाशी मी मनाने जोडले गेले आहे आणि तिथून कधीच एक्झिट होत नसते. माझ्या शुभेच्छा कायम असतील. जिची खरंच कुठे शाखा नाही अशी विशाखा ताई, विनोदाचा बाप पॅडी दादा, माझी अत्यंत जवळची मैत्रीण मयुरा रानडे आणि सुप्रीम प्रियदर्शन दादा तुम्हाला व ‘कुर्रर्रर्रर्र’च्या सर्व टीमला पुढील प्रयोगांसाठी हाऊसफुल्ल शुभेच्छा. रंगमंचापासून फार काळ लांब राहूच शकत नाही. भेटू लवकरचं” असंही म्हटलं.