मराठी सिनेसृष्टीत विविधांगी भूमिका करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे. सुबोधने आजवर अनेक नाटक, मालिका व चित्रपटांमधून काम केले आहे. त्याचबरोबर ‘कट्टयार काळजात घुसली सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शनही त्याने केले आहे. सुबोध हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचबरोबर त्याच्या कामाबद्दलची माहितीही देत असतो. सुबोध हा अभिनेता असण्याबरोबर त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळेही तितकाच ओळखला जातो. अशातच त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सुबोधने नुकतीच ‘इसापनिती’च्या छापा-काटा या कार्यक्रमाला मुलाखत दिली. या कार्यक्रमात त्याने अनेक विषयांवर परखडपणे मत मांडले आहे. यावेळी त्याने सोशल मीडियाबद्दलही त्याचे मत व्यक्त केले. या मुलाखतीत त्याला “आजची तरुणपिढी सोशल मीडियाच्या विळख्यात अडकली आहे. रील्स, व्हिडीओच्या आहारी गेली आहे. तर या तरुणांना तुम्ही काय सांगाल? सुरुवातीच्या काळात त्यांचा पाया भक्कम व्हावा म्हणून तुम्ही त्यांना काय संदेश द्याल? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर सुबोधने उत्तर देत असे म्हटले की, “मी यांना काहीही सांगणार नाही. सोशल मीडियावर प्रत्येकजण कुणाला तरी काहीना काही शिकवतच असतो आणि हे या माध्यमाचे नुकसान आहे. सोशल मीडियावर प्रत्येकजण आदर्शाचा पुतळा व प्रभू श्री राम असल्यासारखे वागतो. त्यामुळे मी कुणालाच काहीच सांगणार नाही. ज्ञानेश्वरांनी जो जे वांछिल तो ते लाभो पसायदान हे असं म्हटलं आहे. अगदी तसंच आहे. त्यामुळे ज्याला जे आवडतं तो ते करतो, ज्याला नाही आवडत तो नाही करणार. त्यामुळे मी सांगून कुणामध्ये काहीच बदल घडणार नसतो. आपल्या महाराष्ट्रात इतकी संतपरंपरा होती. पण महाराष्ट्र सुधारला नाही. तो अजून चिखलात चालला आहे. तर मी सुबोध भावे अगदी सामान्यातला सामान्य माणूस आहे. त्यामुळे माझ्या सांगण्याने काहीच फरक पडणार नाही.
आणखी वाचा – अमृता फडणवीसांचं नवं गाणं ‘तुम्हे आईने की जरुरत नहीं’ प्रदर्शित, आवाज ऐकून नेटकरी म्हणाले, “कर्कश आवाज आणि…”
यापुढे त्यांनी असे म्हटले की, “कुठलीही गोष्ट माणूस तेव्हाच शिकतो, जेव्हा त्याला त्यातून काहीतरी अनुभव आलेला असतो. लहान मुल जसं लहानाचा मोठा होत असताना अनेकदा पडतो आणि मग काही काळाने तो हळूहळू कशाचा तरी आधार घेत उभा राहायला शिकतो. हे उभं राहणं त्याच्या आईच्या सांगण्यावरून आलेलं नसतं तर त्याच्या अनुभवातून तो हळूहळू उभं राहायला शिकलेला असतो. त्यामुळे त्यांना सल्ला म्हणून माझे एकच सांगणे असेल, ते म्हणजे तुम्ही आता जे करत आहात ते आनंदाने व मनापसून करा. त्या प्रक्रियेचा आनंद घ्या. आताच्या डिजिटल युगात कितीतरी नवीन तंत्रज्ञान येत आहेत. पण या सगळ्याला मेहनत हा एकच पर्याय आहे. मेहनतीला पर्याय नाही.”
दरम्यान, सुबोध हा कायम कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असतो. अशातच तो या मुलाखतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचबरोबर कट्टयार काळजात घुसली या चित्रपटाचे दिग्दर्शन केल्यानंतर सुबोध पुन्हा एका दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. लवकरच त्याचा ‘संगीत मानापमान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटात तो दिग्दर्शनाबरोबरच अभिनयही करणार आहे.