कोणत्याही कलाकाराच्या स्ट्रगलच्या काळात शांतपणे विश्वासाने “मी आहे” म्हणणारी व्यक्ती पाठीशी असणे खूप गरजेचे असते. आयुष्याच्या आडवळणावर त्यांना साथीची अत्यंत आवश्यकता असते. कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्याशिवाय, त्यागाशिवाय कोणताही माणूस यशाचं शिखर चढू शकत नाही. नात्यांचा आदर करत त्याने कायमचं कुटुंबाला प्रथम प्राधांन्य दिलं याशिवाय त्याने त्याची कलाही जोपासली. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता समीर चौघुले होय. (Samir Choughule Struggle Story)
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने समीर चौघुलेला विशेष लोकप्रियता मिळाली. ‘हास्यजत्रे’तील त्याच्या विनोदी भूमिकेने आजवर साऱ्यांना भुरळ घातली. समीर चौघुलेचे जगभरात लाखो चाहते आहेत. समीरने त्याच्या कलेच्या जोरावर स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. मात्र यशापर्यंत पोहोचलेल्या समीरचा कठीण काळही तितकाच होता. समीरने बड्या रुपयांची नोकरी सोडत अभिनयक्षेत्रात त्याच्या करिअरची सुरुवात केली.
समीर चौघुलेच्या कठीण काळाबद्दल त्याने नुकत्याच मित्र म्हणजे या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं होतं. यावेळी बोलताना समीर म्हणाला, “मी किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीत काम करत होतो. २००० साली मी नोकरी सोडली तेव्हा मला पंचवीस हजार रुपये पगार होता. नोकरी करत असताना मी बरेच दौरे करायचो त्यावेळी माझी नोकरी व नाटक यांत होणारी तारांबळ पाहून माझ्या बायकोने मला नोकरी सोडण्याचा सल्ला दिला. त्यावेळी माझ्या बायकोने मला नोकरी सोडायला सांगितलं आणि ती हेही म्हणाली की तुझं सर्व नीट होईपर्यंत मी नोकरी करते. एकूणच अभिनयक्षेत्रात येण्यासाठी मला घरून पाठिंबा होता”.
यापुढे बोलताना समीर म्हणाला, “नोकरी करताना पंचवीस हजाराची नोकरी सोडून अभिनयक्षेत्राची सुरुवात करणं हे फार कठीण होतं. अगदीचं तो काळ कठीण होता. तेव्हा नोकरी केली असती तर बरं झालं असत असं नाही, पण आधीचे दिवस बरे होते असं वाटलं होतं. नोकरी सोडल्यानंतर कष्टाचे दिवस सुरु झाले तेव्हा आर्थिक दृष्टिकोनातून बऱ्याच गोष्टींमध्ये मी बदल केला. जस की, नोकरी करत असताना मी ट्रेनने फर्स्टक्लासने प्रवास करायचो पण अभिनयक्षेत्रात आल्यावर मी सेकण्ड क्लासने प्रवास करू लागलो. त्यानंतर कुठेही प्रवास करताना स्टेशनपासून रिक्षाने प्रवास न करता चालत जायचं मी ठरवलं. अशाप्रकारे मी बऱ्याच गोष्टींचा अनुभव घेत माझा कठीण काळ पार पाडला”.