सर्वत्र ‘झिम्मा २’ या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. बॉक्स ऑफिसवर सध्या हा चित्रपट धुमाकूळ घालतोय. हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा २ या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सात बायकांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट चित्रपटगृहात कल्ला करायला सज्ज झाला आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागानेही बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवायला सुरुवात केली आहे. या चित्रपटातील पात्रांची सध्या विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळतेय. (Jhimma 2 New Character)
अशातच ‘झिम्मा २’ चित्रपटातील एका परदेशी अभिनेत्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा परदेशी अभिनेता नेमका आहे तरी कोण? असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल. याबाबत चित्रपटाचा दिग्दर्शक हेमंत ढोमेने पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे. ‘झिम्मा २’ चित्रपटात जॅक मॅकगिन या अभिनेत्याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. याआधीही जॅकने हेमंतच्या सनी या चित्रपटात काम केलं होतं. जॅक उत्तम अभिनेता व संगीतकार आहे. त्याची ओळख करून देत हेमंतने त्याच्याबरोबरचा फोटो शेअर करत पोस्ट शेअर केली आहे.
हेमंतने जॅक बरोबरचा फोटो शेअर करत कॅप्शन देत म्हटलं आहे की, “‘झिम्मा २’ या आपल्या चित्रपटात अत्यंत महत्त्वाची भुमिका साकारणारा आमचा मित्र जॅक मॅकगिन खास सातासमुद्रापार इकडे आला आहे, आपल्या सिनेमासाठी, तुम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी. चित्रपटात त्याने साकारलेली भुमिका तुम्हाला नक्की आवडेल. त्याला आपली भाषा बऱ्यापैकी शिकवली आहे. तो अतिशय प्रेमाने म्हणतो. “म्हला मॅजा ॲली” पण मित्रा तू आल्यामुळे खरंच खूप मजा आली”.
‘झिम्मा २’ चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, निर्मिती सावंत, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू आदी कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत.