हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ हा चित्रपट आजपासून सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. झिम्माच्या अभूतपूर्व यशानंतर या चित्रपटाचा दूसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कोरोना काळानंतर झिम्मा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. त्यानंतर आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाने चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण केली आहे. दरम्यान या चित्रपटावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Actor Abhijeet Khandkekar shared Post About Jhimma 2)
अशातच अभिनेता अभिजीत खांडकेकरने सोशल मीडियावर एक खास पोस्ट करत ‘झिम्मा २’चे कौतुक केले आहे. त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे चित्रपटातील कलाकारांबरोबरचे काही खास क्षण शेअर करत कॅप्शनमध्ये पोस्ट केली आहे. यात त्याने असं म्हटलं आहे की, “झिम्माच्या पहिल्या भागाने अख्खा महाराष्ट्र दणाणून सोडल्यानंतर दुसऱ्या भागात काय असेल याची खूप उत्सुकता होती आणि हेमंतने मला अजिबात नाराज केले नाही. चार-पाच वेगवेगळ्या बायका, त्यांना ट्रीपवर घेऊन जाणारा एक तरूण आणि ह्या संपूर्ण प्रवासात त्यांनाच नाही तर आपल्यालाही पुन्हा नव्याने कळणाऱ्या कितीतरी गोष्टी या चित्रपटात आहेत. साध्या-सोप्या कथेत हेमंतने अतिशय सुरेख रंग भरले आहेत.”
यापुढे त्याने असं लिहिलं आहे की, “मनोरंजन व्हावं म्हणून काहीतरी विनोदी करावं की एखाद्या न बोलल्या जाणाऱ्या विषयावर प्रबोधन करावं ह्या सगळ्याच्या सीमा तोडत कथा कशी मांडावी तर झिम्माच्या कथेसारखी. इरावतीचं लिखाण कधी स्क्रिप्ट वाटतच नाही. यातील प्रत्येक बाईचा स्वभाव, पार्श्वभूमी, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. पण त्यांचं एकत्र येणं तुम्हाला हसवतं, रडवतं व अंतर्मुख व्हायला भाग पाडतं.” यापुढे त्याने हेमंत व चित्रपटातील कलाकारांचे कौतुक करत असे म्हटले आहे की, ‘झिम्मा २’ मध्ये कितीतरी विषयांना योग्य रीतीने हाताळत निर्मिती ताई, सुहास ताई, क्षिती, सुचित्रा ताई अश्या बाप अभिनेत्रींना मुक्त सोडत, सिद्धार्थ, सायली, शिवानी, रिंकू अश्या अनेक कलाकारांकडून खुबीने त्यांची पात्र साकारून घेत आणि मुख्य म्हणजे कुठल्याही बडेजावशिवाय हेमंतने हा ‘महाझिम्मा’ सहजतेनं घातलाय.”
यापुढे त्याने चित्रपटातील प्रत्येक कलाकारांचे वैयक्तिक कौतुक करत असे म्हटले आहे की, “सुहास ताईंनी वेगवेगळे पदर गुंता होऊ न देता अलगद उलगडून दाखवलेत, सुचित्रा ताईसारखी आत्या तर प्रत्येक कुटुंबात असतेच. निर्मिती ताई नुसती पडद्यावर दिसली तरी हास्याचे स्फोट होतात ही तीची ताकद. क्षितीच्या सीनची तर वाट बघावी आणि तीने सिक्सरच मारावा. सायली जशी दिसते, आहे त्याउलट पात्र तिने साकारलं आहे. एवढ्या सगळ्या बायकांना सांभाळणारा कबीर सिद्धूने अतिशय सुरेख साकारला आहे. या सगळ्या जुन्या कलाकरांमध्ये रिंकु व शिवानी नवीन असुनही त्यांनी सुंदर कामं केली आहेत.” यापुढे त्याने लेखक, दिग्दर्शक, निर्माते यांना धन्यवाद म्हणत या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.