‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम आज सातासमुद्रापलिकडे पोहोचला आहे. या कार्यक्रमातील कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं. खरं तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने कार्यक्रमात काम करणाऱ्या कलाकारांना एक वेगळी ओळख दिली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्यांपैकी एक कलाकार म्हणजे प्रसाद खांडेकर. प्रसादचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. त्याने अधिकाधिक मेहनत करत कलाक्षेत्रात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. नुकतंच चाहत्यांना त्याने एक आनंदाची बातमी दिली.
प्रत्येक कलाकाराला स्वतःचं हक्काचं घर हवं असतं. आपल्या हक्काच्या घरात राहावं, आपलं घर सजवावं हे स्वप्न असतं. आता हेच स्वप्न प्रसादने पूर्ण केलं आहे. प्रसादने नवीन घर खरेदी केलं आहे. त्याचेच फोटो त्याने इन्स्टाग्रामद्वारे शेअर करत चाहत्यांपर्यंत आनंदाची बातमी शेअर केली. प्रसादने गृहप्रवेशाचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत.
आणखी वाचा – जिनिलीया तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांवर रितेश देशमुखचं भाष्य, म्हणाला, “मला अजून २-३ मुलं पाहिजे पण…”
फोटो शेअर करत त्याने म्हटलं की, “अजून एक स्वप्न पूर्ण. घर शोधायला एक वर्ष लागलं. घर बांधायला सहा महिने गेले. घर सजवायला दोन महिने. यानंतर नव्या घरामध्ये शिफ्ट झालो आहे. मला जुन्या दोन्ही घरांनी भरभरुन दिलं. त्या दोन्ही वास्तुंचे आभार. मोरया”. नवीन घराबाबत बोलताना प्रसादच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत होता.
प्रसादने शेअर केलेल्या फोटोंमध्ये त्याच्या घराची झलक पाहायला मिळत आहे. त्याने त्याचं घर सुंदर डिझाइन केलं आहे. गृहप्रवेशादरम्यान प्रसादच्या पत्नीच्या पारंपरिक लूकनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. शिवाय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची काही मंडळी प्रसादच्या घरी आली होती. नम्रता संभेराव तिचा पती व मुलासह प्रसादच्या घरी आले. यावेळी तिने त्याला भेटवस्तु दिली. तर गौरव मोरेही प्रसादला शुभेच्छा देण्यासाठी आला होता.