‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री विशाखा सुभेदार घराघरात पोहोचल्या. आपल्या विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. विशाखा या अनेक मालिका तसेच चित्रपटांमध्येही विविध प्रकारच्या भूमिका सकारताना दिसतात. सध्या त्या ‘शुभविवाह’ या मालिकेमध्ये काम करताना दिसत आहेत. या मालिकेमध्ये त्या खलनायिकेची भूमिका साकारताना दिसत आहेत. मात्र विनोदी भूमिकेच्या विरोधात असणाऱ्या त्यांच्या खलनायिकेच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. विशाखा सोशल मीडियावरदेखील अधिक सक्रिय असलेल्या दिसून येतात. खासगी आयुष्यातील अनेक प्रसंग त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतात. (vishakha subhedar on husband)
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या विशाखा यांची एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच लक्षवेधी ठरत आहे. ही पोस्ट त्यांनी पतीसाठी शेअर केली आहे. विशाखा यांचे पती महेश सुभेदार हे देखील अभिनेते आहेत. त्यांचं आता एक नवीन नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘मी vs मी’ हे नाटक असून शिल्पा तुळसकर यांची मुख्य भूमिका असणार आहे. त्यांच्या या नाटकासाठी विशाखा यांनी पोस्ट करत लिहिले की, “खूप खूप शुभेच्छा नवरोबा. महेश सुभेदार खूप खूप शुभेच्छा. खूप गोष्टी सांभाळून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाची जबाबदारी सांभाळून नाटक करत आहेस त्याबद्दल तुझं खूप कौतुक. मी एकमार्गी काम करत असते पण तू दाही दिशा धावत असतोस. नाटक म्हणजे कलाकाराचा जीव”.
पुढे त्यांनी लिहिले की, “पुन्हा एकदा रंगभूमीचा वास-सहवास. तुला खूप शुभेच्छा. अनेक प्रयोग होऊदे. नाट्यनिर्माते श्रीमंत होऊदेत. २५ जानेवारीपासून शुभारंभ आहे. नाटकाचा पहिला प्रयोग आणि तुझा वाढदिवस काय कमाल योग आहे”, असं लिहीत त्यांनी नवऱ्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत. या नाटकामध्ये महेश यांच्यासह क्षितिज दाते, चिन्मय पटवर्धन, दिनेश सिंह व हृषीकेश जोशी हे कलाकार काम करताना दिसणार आहेत.
विशाखा यांच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, त्या लवकरच ‘द दमयंती दामले’ यांच्या नाटकामध्ये दिसून येणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात हे नाटकं रंगभूमीवर येणार आहे. काही दिवसांपूर्वी या नाटकाची घोषणादेखील करण्यात आली आहे. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन संतोष पवार यांनी केले आहे.