अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी राहत्या घरात हल्ला झाला. चोरीच्या बहाण्याने घरात घुसलेल्या हल्लेखोराने सैफवर चाकूने सहा वार केले. या हल्ल्यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सैफवर हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हेगाराचा तपास सुरु केला. अनेक सीसीटीव्ही फुटेजदेखील ताब्यात घेतले. यामध्ये जी व्यक्ती दिसून आली होती तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र आता तब्बल ७० तासांनी पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपीला शनिवारी रात्री ठाणे परिसरातून अटक केली आहे. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. (mumbai police on saif ali khan attack)
सैफवरील हल्लाप्रकरणातील गुन्हेगाराला पकडण्यासाठी ३५ टीम बनवण्यात आल्या होत्या. तसेच या प्रकरणी ५० जणांची चौकशीदेखील करण्यात आली. पोलिसांनी सैफच्या घराच्या आसपास तसेच लोकल व एक्सप्रेस ट्रेनची सर्व फुटेजदेखील तपासली. आरोपी मुंबईबाहेर पळून जाऊ शकतो अशी शंका पोलिसांना होती. दरम्यान तपास करत करत पोलिस ठाणे परिसरात पोहोचले. तेथील हिरानंदानी परिसरात झाडंझुडपांमध्ये लपून बसला असल्याची माहिती मिळाली आणि त्याला त्या ठिकाणाहून अटक करण्यात आले.
दरम्यान आता पोलिसांनी गुन्हेगाराची माहिती उघड केली आहे. आरोपीचं खरं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असून तो बांगलादेश येथील रहिवासी आहे. पोलिसांनी हल्ल्याच्या वेळी काय झालं? याबद्दलही खुलासा केला. त्यांनी सांगितले की, “आरोपी बांगलादेश येथे राहणारा आहे. तो अवैधरित्या भारतात घुसला होता. त्याच्याकडे कोणतेही कायदेशीर भारतीय कागदपत्रं नाहीत. तसेच तो चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरात घुसला होता. आरोपी सहा महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये आला आणि आजूबाजूच्या परिसरात राहू लागला. नंतर तो पुन्हा निघून गेला. सैफवर हल्ला करण्याच्या १५ दिवस आधी तो मुंबईमध्ये परतला. पकडला जाऊ नये यासाठी तो सतत नाव बदलत राहिला”.
पुढे पोलिसांनी सांगितले की, “सध्या तो विजय दास नावाने मुंबईमध्ये राहत होता. त्याच्यावर आता भारतीय दंड संहितेनुसार, कलम ३११, ३१२, ३३१ (४), ३३१ (६) व ३३१ (७) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी याआधीदेखील सैफच्या घरी गेला होता. तो आधी हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये काम करत होता. त्यामुळे त्या कारणामुळे घरी गेला होता. मात्र पोलिसांनी या माहितीमध्ये तथ्य नसल्याचे सांगितले आहे.