सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘अॅनिमल’ हा चित्रपट धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड ब्रेक करत प्रचंड कमाई करत सगळ्यांनाच चकीत केलं आहे. मात्र या सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की हिंदी चित्रपटांच्या गर्दीत मराठी चित्रपट आपलं स्थान टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत. हेमंत ढोमेच्या ‘झिम्मा २’ नंतर आणखी एका चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे तो म्हणजे प्रसाद खांडेकरचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट. दोन दिवसातच या चित्रपटाने लाखोंची कमाई करत सगळ्यांना चकीत केलं आहे. (Namrata Sambherao On Rohit Mane Wife)
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसाद खांडेकर लिखित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात विशाखा सुभेदार, सयाजी शिंदेची, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, नम्रता संभेराव, वनिता खरात, प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने, रोहित माने, गिरीश कुलकर्णी या कलाकारांची फौज आहे. ८ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. चित्रपट प्रदर्शनाआधीपासुनचं चित्रपटातील कलाकार मंडळी चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ही कलाकार मंडळी चित्रपटगृहांमध्ये जात प्रेक्षकांना सरप्राईज भेट देतानाही दिसत आहेत. प्रेक्षकही कलाकारांचं, तसेच चित्रपटाचं भरभरून कौतुक करताना दिसत आहेत.
अशातच नम्रता संभेराव हिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रसाद खांडेकर, रोहित माने, त्याची बायको, वनिता खरात, प्रेक्षक दिसत आहेत. रोहितच्या बायकोला यावेळी उखाणा घ्यायला सांगितलं जातो. हे पाहून रोहित मानेला घाम फुटतो. यावेळी रोहितची बायको श्रद्धा उखाणा घेत म्हणते की, “महाराष्ट्राच्या हास्यजत्रेत सावत्या म्हणतो लगा लगा लगा…आमचा चित्रपट सगळ्यांनी एकदा येऊन तर बघा” सावत्याच्या बायकोने हटके उखाणा घेताच सगळेजण धुमाकूळ घालू लागतात.
तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. ठिकठिकाणी हा चित्रपट हाऊसफुल्लही झाला आहे.