‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने आजवर साऱ्यांना भुरळ घातली आहे. जगभरात या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात व्यस्त आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं आहे. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात हा कार्यक्रम अगदी यशस्वी ठरला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. या कार्यक्रमातील कलाकाराने स्वतःची ओळख निर्माण करत स्वतःचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. यापैकीच एक म्हणजे हास्यवीर प्रभाकर मोरे. (Prabhakar More On Daughter)
प्रभाकर मोरे यांनी त्यांच्या कोकणी बोलीभाषेने प्रेक्षकांना खळखळवून हसवलं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील प्रभाकर मोरे यांचे आगळेवेगळे पात्र रसिक प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडते. हास्यजत्रेतून ‘चिपळूणचा पारसमणी’ म्हणून ओळख मिळवणारे अभिनेते प्रभाकर मोरे त्यांच्या अभिनयाव्यतिरिक्त नृत्य शैलीमुळे चर्चेत असतात. प्रभाकर मोरे यांचा शालू डान्स जगभरात प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरही प्रभाकर मोरे नेहमीच सक्रिय असतात.
प्रभाकर मोरे त्यांच्या कामाबरोबरचं कुटुंबालाही अधिकाधिक वेळ देताना दिसतात. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्रभाकर यांनी कुटुंबाबरोबरचे काही फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर देखील केले आहेत. यांनतर आता प्रभाकर मोरे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रभाकर यांनी शेअर केलेली ही पोस्ट खास आहे. कारण या पोस्टवरून त्यांची लेकही अभिनयक्षेत्रात आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. “‘परदा’ लघुपट. माझ्या लेकीचा पहिलाच प्रोजेक्ट आणि तो ही माझ्याबरोबर. खूप अभिमान वाटत आहे” असं कॅप्शन देत त्यांनी लेकीबरोबर पहिल्यांदा स्क्रीनवर झळकणार असल्याचं सांगितलं.
प्रभाकर यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये, त्यांची लेक स्क्रीनसमोर उभी असलेली दिसत आहे. तर स्क्रीनवर बाप लेक सीन करताना दिसत आहेत. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी प्रभाकर मोरे व त्यांच्या लेकींना शुभेच्छा दिल्या आहेत.