‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा विनोदी कलाकार म्हणजे निखिल बने. निखिलने आजवर या कार्यक्रमातून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात आपली जागा मिळवली आहे. त्याने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतं. या कार्यक्रमासह तो सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो विविध फोटो, व्हिडिओ सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमी शेअर करतो. करोना काळात त्याने शेअर केलेल ट्रेंडिंग रिल्स बऱ्याच व्हायरल झाल्या होत्या. याशिवाय तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही बराच चर्चेत असतो.निखिल त्याच्या आयुष्यातील क्षण, सेटवरची मजामस्ती आणि विविध ट्रेंडिंग रिल्स शेअर करतो. त्याचा हा विनोदी अंदाज चाहत्यांना खूपच आवडतो.(Nikhil bane home tour)
निखिल आणि चाळ हे त्याचं नातं प्रेक्षकांना नेहमीच आपलसं करतं. त्याने त्याच्या एका व्हिडीओमध्ये चाळसंस्कृती व त्यातील आपलेपणा दर्शवला. त्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांनी त्याच्या या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं.निखिल सुरुवातीपासून चाळीमध्येच वाढलेला आहे. त्याच्या कलाकारापर्यंतच्या प्रवासात चाळीच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्याने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या घराची गोष्ट सांगितली. त्यात सांगताना त्याने आपल्या घराबरोबरचा प्रवास सांगितला. ज्याठिकाणी बाबांनी पत्र्याचं घर घेऊन ठेवलं होतं. आता त्याठिकाणी, त्याच जागी एक नवं घर उभारलं. स्वप्नात असणारी बाल्कनीही त्याने प्रत्यक्षात उतरवली आहे.
पुढे घराबाबत सांगताना तो म्हणाला, “तेव्हा घराचं काम करायला घेताना धाकधुक वाटत होती, कसं होईल? पण प्रॉडक्शन हाऊसने माझी खूप मदत केली. आता घर पूर्ण झालं आहे तर आजूबाजूची लोकं ही त्यांच्या घरावर प्लॅस्टिक टाकण्यासाठी आमच्या बाल्कनित येतात. हे घर बांधताना विचार केलेला की ते खूप सुंदर बनेल पण ते इतकं छान बनेल याची कल्पनाही नव्हती. चाळ हेच माझं घर आहे. कारण हे जरी माझं घर असलं तरी मी आमच्या काकींच्या पायरीवर बसलेला असतो. दिवाळी असो किंवा कोणता कार्यक्रम आजही सगळे इथेच जमतात”.
आणखी वाचा – ‘रात्रीस खेळ चाले’च्या शेवंताने घेतलं नवं घर, सोशल मीडियावर पूजा करतानाचे फोटो व्हायरल
“चाळ एक खरी भावना आहे. ती कधीच खोटी असू शकत नाही. इथे सगळ्या भावना खऱ्या आहेत. या जागेवर कोणाचीच फसवणूक होऊ शकत नाही. इथं सगळी एकमेकांच्या जवळ राहतात. कारण इथे जागा कमी आहे. लोकांना जागा कमी असणं ही कमतरता वाटते पण जागा कमी असणं हीच तर चाळीची गुणवत्ता आहे. त्यामुळेच तर इथे सगळे एकमेकांच्या इतके जवळ असतात”. निखिलचं घर लहान असलं तरी अगदी पाहण्यासारखं आणि स्वच्छ, सुंदर आहे.