‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. त्यातील दोन आवडते कलाकार म्हणजे ओंकार भोजने आणि दत्तू मोरे. ओंकारने व दत्तूने त्यांच्या अभिनयाचा पाया ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधूनच रोवला. ओंकार व दत्तूच्या अनेक स्किट्सने सगळ्यांना खळखळून हसवले. ओंकार व दत्तू हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से त्यांनी विविध मुलाखतींमधून सांगितले आहेत. अशातच दत्तूने त्याचा ओंकारबरोबरचा एक खास किस्सा सांगितला आहे. दत्तू व ओंकार हे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शो मधून प्रसिद्धीझोतात आले असले तरी त्यांची मैत्री ही कॉलेजपासूनची आहे. त्यांनी अनेक एकांकिका व नाटकांमधून एकत्र काम केलं आहे. यावेळी त्यांनी संघर्ष करत आजपर्यंतचं स्थान मिळवलं आहे. (Dattu More shared memory of Onkar Bhojane)
दत्तू व ओंकार यांना आज लोकप्रियता व प्रसिद्धी मिळाली असली तरी एकेकाळी दत्तूकडे प्रवासालादेखील पैसे नव्हते आणि या काळात त्याला ओंकारने आर्थिक मदत केल्याचे सांगितलं. ‘Tiny Talkies’ या युट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दत्तूने ओंकारचा एक किस्सा सांगितला आहे. यावेळी दत्तूने ओंकारबद्दल असं म्हटलं की, “एक खाजगी किस्सा आहे जो मला सांगायला आवडेल. ओंकार भोजनेचा स्वभाव खूपच छान आहे. तो कलाकार म्हणून तर भारी आहेच. पण माणूस म्हणूनही तो कमाल आहे. आम्ही नाटक एकांकिकेच्यादरम्यान खूप तालीम करत होतो आणि त्या प्रक्रियेत असताना आर्थिक बाजू कमकुवत होती. कारण एकांकिकेमधून तेवढे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे दिवसांचं आर्थिक गणित ठरलेलं असायचं. बसने घरी ठाण्याला जायला १३ रुपये लागायचे, त्यामुळे १३+१३ असे एकूण २६ रुपये लागायचे. असं करुन मी माझ्याकडे जवळपास ५० रुपये ठेवायचो”.
यापुढे दत्तूने असं सांगितलं की, “एकेदिवशी आम्ही तालीम संपल्यानंतर घरी जायला निघालो. तेव्हा मी आमच्यापैकी कुणाशी तरी बोलताना असं म्हटलं होतं की, जाताना माझ्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे मी इथेच राहतो. माझ्याकडे घरी जायला पैसेच नाहीत”. माझं हे बोलणं ओंकार भोजनेने ऐकलं होतं. त्यामुळे काही वेळाने आम्ही पुढे गेल्यानंतर ओंकार अचानक माझ्या मागून मागून आला आणि त्याने मला पैसे दिले. पैसे देत मला तो बोलला की, “ऐकना हे पैसे तुझ्याकडे ठेव ना. मला आता गरज नाही. नंतर मला होईल तसं दे”.
यापुढे दत्तू म्हणाला की, “ओंकारने मला पैसे देताच मी त्याला “का?” असं विचारलं. तर त्यावर ओंकार मला बोलला की, “माझ्याकडे आता जास्तीचे पैसे आहेत. जेव्हा लागतील तेव्हा मला दे”. तेव्हा मला कळलं की, माझ्याकडे पैसे नाहीत हे त्याला कळलं होतं. माझ्याकडे पैसे नाहीत हे ओळखून त्याने मला तेव्हा पैशांची मदत केली होती. त्यानंतर मी त्याला अनेकदा पैसे दिले. पण ओंकारने ते पैसे घेतलेच नाहीत”. दरम्यान ओंकार-दत्तूच्या या प्रसंगातून त्यांच्यातील निखळ व खऱ्या मैत्रीचे दर्शन झालं.