‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेमध्ये दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट हे येतच असतात. मालिकेत घडणाऱ्या घडामोडी आणि मालिकेत येणारे नवनवीन ट्वीस्ट हे प्रेक्षकांना नेहमीच खिळवून ठेवताना दिसत आहे. प्रेक्षकांना कायमच मालिकेत पुढे काय होणार ही उत्सुकता लागलेली पाहायला मिळते. मालिकेत दाखविल्याप्रमाणे, अक्षरा व अधिपती हनिमूनसाठी फुकेतला गेल्यावर अधिपतीचे वडील व भुवनेश्वरी यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण होते. या भांडणात अधिपतीचे वडील भुवनेश्वरीला घराबाहेर काढतात. जेव्हा अधिपती व अक्षरा घरी परत येतात, त्यावेळी त्यांना भुवनेश्वरी घरात नसल्याचे जाणवते. ते भुवनेश्वरीला सगळीकडे शोधतात पण ती त्यांना सापडत नाही.
काही दिवसांपूर्वी मालिकेत चारुलता येणार असल्याचा नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाला. बाजारात अक्षराला एक बाई दिसते, ओळखीची वाटल्याने आणि भुवनेश्वरीच असू शकते या विचाराने ती तिचा पाठलाग करते. समोर आलेल्या बाईला ती भुवनेश्वरी समजत असते पण समोरची महिला तुमचा काहीतरी गैरसमज झाल्याचे म्हणते. मी भुवनेश्वरी नसून चारुलता आहे, अशी ओळख ती सांगते. अशातच आता ‘झी मराठी वाहिनी’ने मालिकेच्या पुढच्या भागात काय होणार, याची झलक दाखवणारा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
नवीन प्रोमोमध्ये चारुलता सूर्यवंशींच्या घरी प्रवेश करतानाचे पहायला मिळत आहे आणि स्वत: अक्षरा तिला या घरात घेऊन येतानाचे पाहायला मिळत आहे. तसंच चारुहास देवीआईकडे “चारुलता गेल्यानंतर प्रत्येक दिवशी मला तिची उणीव भासत आहे. ज्या एका स्त्रीवर मी मनापासून प्रेम केलं. त्या व्यक्तीला तू माझ्यापासून इतकं लवकर दूर का नेलंस? ती गेल्यापासून प्रत्येक दिवस मला ओझं वाटत आहे. त्यामुळे मला जगण्याचा काहीच अधिकार नाही” असं म्हणत आहे.
यापुढे तो आत्महत्या करण्याच्या उद्देशाने हातात विषाची बाटली घेतानाचे पाहायला मिळत आहे, एकीकडे त्याच्या हातात विषाची बाटली आहे तर दुसरीकडे चारुलता दारातील माप ओलांडत सूर्यवंशींच्या घरात गृहप्रवेश करत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता मालिकेत आणखी नवीन काय ट्विस्ट येणार? चारुलतामुळे आता अधिपती-अक्षरा यांच्या नात्यात काय नवीन वळण येणार? चारुहास या चारूलताला आपली आई म्हणून स्वीकारणार का? असे अनेक प्रश्न आगामी भागातून पाहायला मिळणार आहे