Emrgency Movie Trailer : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या खूप चर्चेत आहे. आजवर तिने अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे. तिच्या सर्वच भूमिकांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. अभिनयाबरोबरच तिने काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आहेत. अशातच तिने आता मनोरंजन क्षेत्र सोडून राजकारणात प्रवेश केला आहे. हिमाचल प्रदेश येथील मंडी या भागातून ती निवडून आली. त्यानंतर चंदीगढ एअरपोर्टवर एका महिला कॉन्स्टेबलने तिच्या कानाखाली मारल्यानेही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.मात्र तिचा एक बहुचर्चित चित्रपट ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून या ट्रेलरला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे.
आज स्वातंत्र्य दिवसाच्या पूर्वसंध्येला कंगनाच्या नवीन चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. यामध्ये कंगनाने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या लूकमध्ये दिसून येत आहे. काही मिनिटांच्या ट्रेलरमध्ये कंगनाच्या अभिनयाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या चित्रपटामध्ये १९७५ साली लावण्यात आलेल्या आणीबाणीबद्दलचे प्रसंग दाखवण्यात आले आहेत.
या ट्रेलरमध्ये कंगनाचे हावभाव इंदिरा यांच्यासारखेच असलेले दिसून येत आहेत. हे बघून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या चित्रपटामध्ये आणीबाणीच्या वेळी नक्की काय परिस्थिती होती हे दाखवण्यात आले आहे. यामध्ये इंदिरा यांचा राजकीय प्रवास दाखवण्यात आला. तसेच यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरु यांनी त्यांच्या कार्यकाळात युद्ध परिस्थिती असतानादेखील कसे मार्ग काढले याबद्दल दाखवण्यात आले आहे.
या चित्रपटामध्ये कंगना व्यतिरिक्त श्रेयस तळपदे, सतीश कौशिक, महिमा चौधरी, अनुपम खेर व मिलिंद सोमण हे कलाकारदेखील दिसणार आहेत. हा चित्रपट ६ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील कंगनाने केलं आहे. हा चित्रपट आता बॉक्सऑफिसवर काय कमाल करणार हे आता पाहण्यासारखे आहे.