Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या नवीन पर्वाची सुरुवात २८ जुलैपासून झाली असून प्रेक्षकांकडून या शोला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्याच आठवड्यात नॉमिनेशनची तोफ डागण्यात आली असता त्यामध्ये सहा सदस्य नॉमिनेट झाले होते. यात कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांचा पहिल्याच आठडव्यात ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपला. त्यामुळे पुरुषोत्तम पाटील यांचा खेळ फारसा पाहायला मिळाला नाही, असं असलं तरी घरातून निघताना शेवटच्या क्षणी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संतांचा जयजयकार केलेला पाहून त्यांनी अनेकांची मन जिंकली. सोशल मीडियावरुन त्यांच्या या कृतीच खूपच कौतुक करण्यात आलं. अशातच पुरुषोत्तम दादा पाटील यांनी नुकतीच ‘रेडिओ सिटी मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी घरातील सर्व सदस्यांविषयी मनमोकळेपणाने संवाद साधला.
पुरुषोत्तम दादा पाटील यांनी घरातील सर्व सदस्यांबद्दलची खटकणारी व आवडणारी गोष्ट सांगितली. तेव्हा त्यांनी वर्षा उसगांवकरांचा स्वभाव आवडत नसल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “वर्षाताईंची माफी मागून मी हे बोलतो की, त्यांना पाहिल्यानंतर मला आनंद वाटला होता. त्या इतक्या मोठ्या अभिनेत्री आहेत. आपण त्यांच्याबरोबर राहणार आहोत, बोलणार आहोत. याबद्दल मला आनंद झाला होता. पहिल्या ओळखीतच त्यांनी “तुम्ही काय करता? कुठे असता?” हे विचारलं. यावर मी त्यांना “मी कीर्तन करतो आणि राहायला आळंदीला असतो” असं म्हटलं. त्यानंतर त्यांनी मला “तुम्ही पूर्णवेळ कीर्तनच करता का?” असं विचारलं. त्यांची ही विचारण्याची पद्धत मला कुठे तरी खटकली”.
यापुढे पुरुषोत्तम यांनी असं म्हटलं की, “आपण यांच्याकडे इतक्या आदराने पाहतोय आणि आपल्यापेक्षा या वयाने मोठ्या आहेत. यांच्यात आपण आपली मोठी बहीण शोधत आहोत. मातृत्वाच्या भावनेने पाहत आहोत. तितक्याच प्रेमाने त्यांनी मला विचारलं पाहिजे होतं. मला त्यांची विचारपूस करण्याची पद्धत थोडीशी खटकली. आमची ती पहिलीच मुलाखत होती. त्यामुळे तिथे ते मला खटकलं. नंतर पुढे मी वर्षाताईंबरोबर सहा-सात दिवस राहिलो. तेव्हा वर्षाताई माझ्याशी खूप आदराने वागल्या. पण घरात गेल्यानंतर आपल्या डोक्यात असतं की, एखाद्या व्यक्तीने आपल्याबरोबर चांगलं वागलं पाहिजे. पण त्यावेळी त्यांनी माझ्या मनाच्या विरोधात गेल्यासारखं झालं”.
दरम्यान, ४ ऑगस्टला पार पडलेल्या भाऊच्या धक्क्यावर पुरुषोत्तमदादा पाटील घराबाहेर पडले. यामुळे घरातील काही सदस्य भावूक झाले. पुरुषोत्तम दादा पाटील घरातून गेल्याने घन:श्याम दरवडे अधिक भावूक झाला. घरातून बाहेर जाताना पुरुषोत्तमदादा पाटील यांनी ‘राम कृष्ण हरि’ म्हणत सदस्यांना रामराम केला. पुरुषोत्तम दादा पाटील आळंदी येथील प्रसिद्ध किर्तनकार आहेत. याशिवाय किर्तनावेळी नाचतात म्हणून त्यांच्यावर सोशल मीडियावर अनेकदा टीकाही केली जाते.