‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे जगभरात लाखो चाहते आहेत. हा कार्यक्रम जेव्हापासून सुरु झाला तेव्हापासून या कार्यक्रमाला स्वतःचा असा चाहता वर्ग मिळाला आहे. प्रेक्षकांचाही या कार्यक्रमाला भरभरुन प्रतिसाद मिळत असतो. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक कलाकारांना आपल्या कलेच सादरीकरण करण्याची मोठी संधी मिळाली. या कार्यक्रमामुळे कलाकारांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली असल्याचं पाहायला मिळालं आहे. (Maharashtrachi Hasyajatra)
सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात या कार्यक्रमाचे दौरे सुरु असलेले पाहायला मिळतात. या कार्यक्रमातील कलाकार मंडळी ही त्यांच्या प्रेक्षक वर्गाला हसवायला कायमच सज्ज असतात. या कार्यक्रमात समीर चौगुले, वनिता खरात, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, पृथ्वीक प्रताप, निखिल बने, गौरव मोरे, प्रियदर्शनी इंदलकर, ईशा डे ही कलाकार मंडळी प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. तर अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या सूत्रसंचालनाने हा कार्यक्रम अधिकच बहरदार होताना पाहायला मिळतो. इतकंच नव्हे तर या कार्यक्रमात जज म्हणून अभिनेता प्रसाद ओक व अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी आजवर उत्तमरीत्या बाजू सांभाळलेली पाहायला मिळते.
कार्यक्रमात स्किट दरम्यान एकमेकांवरील केले गेलेले विनोद हे या कार्यक्रमाची खासियत आहे. अशातच अनेकदा या कार्यक्रमाचे जज प्रसाद ओक यांच्यावरही पंचेस केलेले पाहायला मिळतात. बरेचदा कलाकार मंडळी त्यांच्याकडून पार्टी मागत असल्याचं स्किटमध्ये पाहायला मिळत. अखेर आता प्रसादने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील कलाकार मंडळींना पार्टी दिली आहे. “ऐका हो ऐका. अखेर हास्यजत्रा टीमला पार्टी दिलेली आहे. समस्त रसिकांनी या घटनेची नोंद घ्यावी. मंडळ आभारी आहे”, असं म्हणत प्रसादने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन खास फोटोदेखील पोस्ट केले आहेत.
प्रसादबरोबरच हास्यजत्रेतील इतरही कलाकारांनी इंस्टाग्राम पोस्ट वरुन काही फोटो शेअर करत पार्टी दिली असल्याचं म्हटलं आहे. यावेळी प्रसादच्या नव्या घराचीही झलक पाहायला मिळत आहे. हास्यजत्रेतील कलाकार मंडळींनी ही प्रसादने दिलेली पार्टी खूप खास असल्याचं म्हणत पोस्ट केली आहे. नम्रता संभेराव हिने देखील प्रसाद व मंजिरी ओक यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत, “सुंदर घर, अशारितीने ओंकाची पार्टी सुफळ संपूर्ण”, असं म्हणत खास फोटो पोस्ट केला आहे.