‘ससुराल सिमर’ या मालिकेतून अभिनेत्री दीपिका कक्कर इब्राहिम घराघरांत पोहोचली. दीपिकाने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. अभिनेत्री व्यावसायिक आयुष्याबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. तिने अभिनेता शोएब इब्राहिमसह लग्न केले आहे. शोएबसह लग्न केल्यानंतर दीपिकाने धर्म बदलला. तिने मुस्लिम धर्म स्वीकारला आहे. शोएब व दीपिकाच्या लग्नाच्या पत्रिकेवरही अभिनेत्रीचे नाव फैजा असे लिहिले होते. त्यावेळी धर्म बदलल्यामुळे दीपिकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. (Dipika Kakar Ibrahim Trolled)
शोएबबरोबरच्या लग्नानंतर दीपिकाही रमझानचे उपवास ठेवू लागली आहे. या दिवसांतही ती रमजानमध्ये उपवास करत आहे. इफ्तारीच्या तयारीची झलक दीपिका व्हिडीओद्वारे चाहत्यांशी शेअर करत असते. मात्र, यामुळे दीपिकालाही ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अनेक नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, “दीपिकाने तिचे नाव बदलून फैजा ठेवावे, ती दोन्ही धर्मांची खिल्ली उडवत आहे”.
तर आणखी एका युजरने म्हटले आहे की, “नवरात्रीही येत आहे मॅडम, उपवास ठेवण्यासाठी तयार रहा. आणि जसे तुम्ही उपवास ठेवता तसे तुमच्या पतीलाही ठेवायला तयार करा”. तर एका युजरने लिहिले आहे की, “दीपिका कुठली आहे हे कस विसरू शकते, तिचं हे वागणं पाहणे अत्यंत धक्कादायक आहे”. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “फैजा बेगम एकेकाळी टीव्ही शोची आघाडीची अभिनेत्री होती”. एकाने लिहिले आहे की, “एका जुन्या मुलाखतीत दीपिकाने सांगितले होते की, मी करवा चौथचा उपवास कधीही ठेवणार नाही. पण तुम्ही उपवासही करत आहात. दुसऱ्याच्या सणाची चेष्टा का करताय?” तर एकाने लिहिले आहे, “आता सगळे तिला फैजा म्हणत आहेत. दीपिका इब्राहिमच्या नावाने ती दोन्ही धर्मांची खिल्ली उडवत आहे”. चाहते अशा अनेक कमेंट करताना दिसत आहेत.
दीपिका आणि शोएबचे लग्न २२ फेब्रुवारी २०१८ रोजी झाले होते. हे दाम्पत्य त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहे. दोघांनाही एक मुलगा आहे. त्यांनी आपल्या मुलाचे नाव रुहान असे ठेवले आहे.